होमपेज › Satara › पाटण पंचायत समितीचे चार अधिकारी निलंबित

पाटण पंचायत समितीचे चार अधिकारी निलंबित

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 22 2019 1:35AM
सातारा : प्रतिनिधी

पाटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये  2017 व 18 या आर्थिक वर्षात झालेल्या तपासणी अहवालाच्या वाचन प्रसंगी शनिवारी बरेच कर्मचारी वेळेत उपस्थित न राहिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी नाराजी दर्शवली. तसेच उपस्थित नसलेल्या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी.एस. शेजवळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही.एच. सानप, विस्तार अधिकारी एम.ए. पाटील, पशुधन पर्यवेक्षक यु.व्ही. खेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत 2017 व 18 च्या तपासणीमधील मुद्द्यांचे अहवाल वाचन शनिवार दि.21 रोजी सकाळी 11 वाजता पाटण पंचायत समितीच्या सभागृहात ठेवण्यात आले होते. अहवाल वाचन असल्याने संजय भागवत हे वेळवर पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित राहिले. परंतु, अधिकारी व कर्मचारी बराच वेळ अहवाल वाचनासाठी आले नव्हते. त्यामुळे उपस्थित नसलेल्या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना भागवत यांनी दिल्या. त्यानुसार पाटण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी जी.एस. शेजवळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही.एच. सानप, विस्तार अधिकारी एम.ए. पाटील, पशुधन पर्यवेक्षक यु.व्ही. खेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली  असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.

संबंधित 4 अधिकार्‍यांना पहिल्या 3 महिन्याच्या निलंबन कालावधीमध्ये  कोणत्याही प्रकारचा धंदा अथवा नोकरी केली नसल्याचे प्रमाणपत्र दरमहा गटविकास अधिकार्‍यांना सादर करावयाचे  आहे. निलंबन कालावधीमध्ये संबंधित कर्मचार्‍यांचे मुख्यालय पाटण पंचायत समिती राहिल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी काढलेल्या निलंबन आदेशामध्ये म्हटले आहे. सिईओंच्या  निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, अहवाल वाचन मुद्यावर अनेक कर्मचार्‍यांनी मुद्यानुसार उत्तरे दिली नाहीत. तसेच बरेच कर्मचारी रजेवर गेले असल्याचे पंचायत समितीमधील अधिकार्‍यांनी सांगितले. अहवाल वाचन असताना कोणाच्या परवानगीने कर्मचारी अधिकारी रजेवर गेले,अशा शब्दात संजय भागवत यांनी नाराजी व्यक्‍त केली. मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी जाग्यावर नसल्याने मध्येच अहवाल वाचन थांबवण्यात आले.  पुन्हा 15 दिवसांनी  अहवाल  वाचन ठेवण्यात येणार असल्याचे संजय भागवत यांनी सांगितले.