Wed, Aug 12, 2020 08:26होमपेज › Satara › कोपर्डेत गुंडाचा व्यावसायिकावर गोळीबार 

कोपर्डेत गुंडाचा व्यावसायिकावर गोळीबार 

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:33PMकराड : प्रतिनिधी 

कराड तालुक्यात पुन्हा एकदा ‘गँगवॉर’ची शक्यता बळावली असून कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील युवराज साळवे याच्यासह त्याच्या पाच साथीदारांनी बेलवाडीतील प्रशिक्षण संस्थेच्या सचिवांच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने यातून ते बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहा लाखांच्या खंडणीसाठी हे कृत्य करत मारहाण करून संबंधिताच्या गळ्यातील 16 तोळ्यांच्या दोन चेनही हिसकावून घेण्यात आल्या आहेत. 

याप्रकरणी महेश भगवान गायकवाड (रा. सिद्धिविनायक कॉलनी, होली फॅमिलीनजीक, सैदापूर, ता. कराड) यांनी याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी युवराज साळवीसह बाळू कांबिरे (रा. कांबिरेवाडी, ता. कराड) याच्यासह अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साळवी हा कुख्यात गुंड सल्या चेप्याच्या हत्या प्रकरणाशी निगडित असून सद्यःस्थितीत तो जामिनावर बाहेर आहे.

महेश गायकवाड हे मूळचे मसूर परिसरातील बेलवाडी गावचे रहिवाशी असून जय हनुमान करिअर प्रशिक्षण संस्थेशी संबंधित आहेत. ते रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मसूरहून फॉरच्युनर गाडीतून कराडकडे येत होते. ते उत्तर कोपर्डे गावच्या हद्दीतील रेल्वे गेटजवळ आले असता त्यांच्या गाडीच्या पाठीमागून भरधाव वेगात एक स्कॉर्पिओ आली. ही स्कॉर्पिओ गायकवाड यांच्या गाडीच्या आडवी लावत त्यातून युवराज साळवी व त्याचे साथीदार गायकवाड यांच्या गाडीकडे गेले. त्यानंतरत्या सर्वांनी गायकवाड यांना 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, गायकवाड यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर बाळू कांबीरेसह साळवेच्या साथीदारांनी गायकवाड यांना मारहाण केली. 

मारहाणीवेळी बाळू कांबीरे याने गायकवाड यांच्या गळ्यातील प्रत्येक आठ तोळ्यांच्या दोन सोन्याच्या चैन हिसकावून घेतल्या. तसेच यावेळी ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने गायकवाड यांनी आपली गाडी तेथेच सोडून रेल्वे गेटच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी संशयितांनी गायकवाड यांचा पाठलाग करत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने यातून गायकवाड बचावले. मात्र, त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराडच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणाची माहिती सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी रूग्णालयात व घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी सहाच्या सुमारास रूग्णालयात गायकवाड यांचा जबाब नोदवण्यात आल्यानंतर याप्रकरणी सांयकाळी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकींचे सत्र सुरू...

या गंभीर प्रकरणानंतर पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे हे सायंकाळी उशिरापर्यंत कराड शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह अन्य विषयांवरबरोबरच कोपर्डेजवळील या घटनेबाबतही करण्यात आली. तसेच गँगवॉर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Tags : satara, karad news, crime, Mahesh Gaikwad, Firing,