Sun, Aug 09, 2020 10:23होमपेज › Satara › शिक्षणाधिकार्‍यांचीही होणार परीक्षा

शिक्षणाधिकार्‍यांचीही होणार परीक्षा

Published On: May 27 2019 1:37AM | Last Updated: May 26 2019 10:51PM
सातारा : प्रवीण शिंगटे

शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार निश्‍चित केलेले सार्वत्रिक व समन्वयी गुणवत्ता पूर्वक शिक्षणाच्या जबाबदारीबाबत दै.  पुढारीने ‘विद्यार्थ्यांची नव्हे, शिक्षण  अधिकार्‍यांची परीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केल्यानंतर दि. 4 जून रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांसह शिक्षण विस्तार अधिकार्‍यांची परीक्षा होणार असल्याने दै. पुढारीचे वृत्त खरे ठरले असून परीक्षेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी तसा आदेश काढला आहे.

भावी पिढी सक्षम होण्यासाठी राज्यासह जिल्ह्याचा शिक्षण विभाग अलर्ट असणे गरजेचे आहे.परंतु, सातारा जिल्ह्याचा शिक्षण विभाग सध्या सुस्तावलेला  दिसत आहे.शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना आपले काय काम आहे? याचीच कल्पना नसल्याने ते फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहेत. ही बाब मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.त्याबाबत दै. पुढारीने वृत्तही प्रसिध्द केले होते. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिक्षण हक्क अधिनियमांची अंमलबजावणी करून सार्वत्रिक व समन्वयी गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याच्या कार्यवाहीवर सनियंत्रण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षी यंत्रणेवर सोपविलेली आहे.ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पर्यवेक्षी यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे.पर्यवेक्षीय यंत्रणेचे  कार्य व जबाबदार्‍यांची जाणीव करून देणे व त्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी दि. 4 जून रोजी सकाळी 9.30 ते 11 यावेळेत अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा घेण्यात येणार असल्याचा आदेश डॉ. कैलास शिंदे यांनी काढला असून तो सर्व अधिकार्‍यांना बजावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व डाएटचे प्राचार्य यांची सकाळी 9.30 ते 11 यावेळेत स्थायी समितीच्या सभागृहात 20 गुणांची तर शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, गट प्रमुख, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांची सकाळी 9.30 ते 11 यावेळेत 20 गुणांची छ. शिवाजी सभागृहात परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी  शिक्षणाचा हक्क अधिनियम, समग्र शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, शालेय आरोग्य तपासणी, शाळा सिध्दी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, अध्ययन स्तर निश्‍चिती, अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण पध्दती, अध्ययन अक्षम मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, यु डायस, सरल, स्पर्धा परीक्षा,शिष्यवृत्ती, नवोदय हा अभ्यासक्रम आहे.

ही परीक्षा जिल्हा परिषद प्रशासनामार्फत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांना आता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या अभ्यासक्रमावर अभ्यास करूनच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

या 20 गुणांच्या परीक्षेत कोणाला पैकीच्या पैकी गुण मिळणार? कोण प्रथम क्रमांक मिळवणार? याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

शिक्षण हक्क अधिनियमांची अंमलबजावणी करून सार्वत्रिक व समन्वयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याच्या कार्यवाहीवर सनियंत्रण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर सोपवली असली तरी या अधिकार्‍यांना आपले हक्क व कर्तव्ये काय आहेत? याची साधी माहिती  नसल्याने ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  -डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी