Tue, Jul 07, 2020 17:39होमपेज › Satara › बंदनंतर एसटीची प्रवाशांना हुलकावणी

बंदनंतर एसटीची प्रवाशांना हुलकावणी

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:27PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

मराठा आरक्षणासाठी राज्यभर महाराष्ट्र बंदच्या माध्यमातून ठिकठिकाणी आंदोलने झाली. यापूर्वी झालेल्या आंदोलनाचा धसका घेतल्याने महामार्गावरून धावणारी तसेच खेडयापाडयात जाणारी लाल परी अर्थात राज्य परीवहन महामंडळाची एसटी महाराष्ट्र बंदमध्ये कोठेही दिसली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान नसले तरी तोटा मात्र मोठया प्रमाणात झाला आहे. तथापि आज शुक्रवारी सर्व काही सुरळीत सुरू असतानाही लाल परीचे दर्शन दुर्मिळ झाल्याने दोन दोन तास एसटीची वाट पाहणा-या  शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच नोकरदार मंडळीना एसटी ने हुलकावणी दिल्याने प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल झाले.

यापूर्वी झालेले बंद मग ते ऊ स दर आंदोलन असो, दुध दर आंदोलन असो की, मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन असो या आंदोलनाच्या आंदोलन कर्त्याकडून अनेक ठिकाणी एसटीची सुटका झाली नाही. यामध्ये एसटीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चा मध्ये विदर्भासह अनेक ठिकाणी एसटीचे नुकसान झाल्याने राज्य परीवहन महामंडळाने गुरूवारी झालेल्या महाराष्ट्र बंद मध्ये एसटी रस्त्यावर काढलीच नाही. एकवेळ तोटा सहन करू मात्र नुकसान नको अशीच काहीशी भूमिका एसटी महामंडळाच्या अधिका-यांनी घेतल्याने कालच्या महाराष्ट्र बंद मध्ये सातारा जिल्हयात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावरून धावणारी  एसटी कोठेच दिसली नाही. 

गुरूवारी संपूर्ण दिवस बंद मध्ये सहभाग घेतलेल्या लाल परीने आज शुक्रवारी पहाटे पासूनच रस्त्यावर यायला हवे होते.व तसेच एसटी महामंडळाच्या अधिका-यांनी नियोजन करावयास हवे होते. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत लाल परी महामार्गावरून जाताना  क्‍वचितच दिसली. 

उंब्रज येथे शाळा महाविद्यालयाला खेडयापाडयातून येणा-या विद्यार्थ्यांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे. अनेक ठिकाणी मुक्‍कामी एसटी गेली नाही त्यामुळे विद्यार्थ्याना उंब्रज, कराड व सातारा येथे शाळा कॉलेजला जाता आले नाही तर उंब्रज येथून कराड व सातारा येथे शाळा कॉलेजला जाणा-या विद्यार्थ्यांची तसेच नोकरदार मंडळींची संख्या मोठया प्रमाणात असून, सकाळी साडे सहा वाजता आलेल्या विद्यार्थ्यासह अन्य प्रवाशांना साडे आठ वाजले तरी एसटी येवू न शकल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. 

दोन ते तीन  तासाने एखादी एसटी महामार्गावरून धावताना दिसत होती. एसटीची वाट पाहून प्रवाशी हैराण होत होते. तर अनेक विद्यार्थ्यानी एसटीची वाट पाहता पाहता कॉलेज सुटेल या विवंचनेत कॉलेजला न जाण्याचे पसंत केले. तर नोकरदार मंडळींचे मात्र मोठया प्रमाणात हाल झाले.

कराड आगारातून सुटणार्‍या चाफळ, तारळे, चोरे या एसटी सकाळी दहा नंतर सोडणार असल्याचे वाहतुक नियंत्रक कक्षातून प्रवाशांना सांगण्यात येत होते. मात्र सकाळी आठ नंतर सातारा पाटण ही एसटी सुरू झाल्याने किमान पाटण मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. मात्र कराड, कोल्हापूर, सांगली तसेच सातारा, पुणे, मुंबई याठिकाणी जाणार्‍या प्रवाशांचे तसेच शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात हाल झाले. 

दरम्यान शुक्रवारी एसटी महामंडळाने विविध मार्गावर एसटी तातडीने सोडण्याची तत्परता न दाखविल्याने खेडयापाडयात तसेच महामार्गावर एसटीची वाट पहात बसलेल्या शाळा कॉलेजच्या विद्याबरोबरच अन्य प्रवाशी व नोकरदार मंडळींचे मोठया प्रमाणात हाल झाले.