Tue, Jul 07, 2020 17:29होमपेज › Satara › माणमध्ये जनावरे कवडीमोल; मेंढपाळांचे स्थलांतर

माणमध्ये जनावरे कवडीमोल; मेंढपाळांचे स्थलांतर

Published On: Feb 14 2019 1:36AM | Last Updated: Feb 13 2019 11:28PM
दहिवडी : राजेश इनामदार

माण तालुक्यात दुष्काळाने पुन्हा रुद्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोमेल भटकंती करावी लागत आहे तर जनावरांच्या चार्‍याची गंभीर टंचाई निर्माण झाल्याने पशुपालक शेतकरी हवालदिल झाला आहे. तीव्र उन्हाळा जवळ आला असताना चराऊ चार्‍याची टंचाई निर्माण झाल्याने जीवापाड जपलेली जनावरे विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  मेंढपालांनी तर चार्‍याच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे. आंधळी धरणासह  तालुक्यातील पाच मध्यम प्रकल्प आटले आहेत. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे. 

दहिवडीत यावर्षीही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. आंधळी धरणातील पाणीसाठा संपुष्ठात आला आहे. उरमोडी योजनेचे पाणी पिंगळी तलावात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने दहिवडी शहराचा पिण्याच्या प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सध्या तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.  उरमोडी योजनेचे पाणी सोडल्याने टँकर भरणे सुलभ होऊन जनावरांच्या व वापराच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सध्या तालुक्यातील काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

पशुपालक शेतकरी चारा टंचाईने मेटाकुटीला आला आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला असताना चारा आणि पाण्याअभावी काही पशुपालकांनी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे. राणंद मध्यम प्रकल्पात केवळ 0.07 द.ल.घ.मी  पाणी साठा शिल्लक असून कुकुडवाड मंडळाला पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात सलग कायम पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

गतवर्षी या दिवसात आंधळी धरणांने तळ गाठला होता तर राणंद तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर होता. मात्र, यावर्षीची परिस्थिती बरीच बिकट बनत चालली आहे. तसेच आंधळी धरणावर दहिवडी व गोंदवले गावाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असल्याने गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठा संपुष्टात येत चालला आहे धरणात पाणी नाही . 

माण तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीपाचे पेरलेले पीक हातात न घेता जनावरणांना चारले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली होती.  मात्र पुन्हा तुरळक पावसावर रब्बीच्या पेरणी केल्या त्यातून शेतकर्‍यांच्या हातात केवळ ज्वारीचे बाटुकही  नीट आले नाही. खरीप जळाला रब्बी वाया गेला आता काय करायचे हा गहन प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा आहे. मोठ्या जनावरांबरोबर मेंढपाळ शेळीपालक यांना मोठ्या प्रमाणात चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मेंढपाळ चार्‍याच्या शोधार्थ सातारा, कराड, पाटण, कोकण या भागात स्थलांतर केले आहे.  

उरमोडीच्या पाण्याची आवर्तन सुरू ठेवल्यास फायदा पिंगळी, ढाकणी, लोधवडे तलाव व पळशीच्या सिमेंटसाखळी बंधार्‍यांना होणार  आहे. हे पाणी सोडल्यास या परिसरातील शेतकरी चार्‍याची पिके घेऊ शकतात त्यातून काही अंशी चार्‍याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो उरमोडीचे पाणी पुन्हा येईल याकडे अनेक शेतकर्‍यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

पावसाळ्यात उरमोडीचे पाणी ढाकणी तलावात सोडण्यात आले होते. परिणामी याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात दिसून आला. मात्र आता रब्बी हंगामाची पिके हातात घेताना पाणी कमी पडले आहे.सध्या आंधळी धरण, पिंगळी, गंगोती, जांभुळणी, महाबळेश्‍वरवाडी हे तलाव पूर्ण आटले आहेत. ढाकणी तलावात उरमोडीचे पाणी सोडल्याने मृत साठ्यात वाढ झाली आहे. उरमोडीच्या पाण्याने सध्या पिंगळी तलावाखालील 6 बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हे फायदे तात्पुरते असून याचा फार मोठा फायदा शेतकर्‍यांना होत नाही.

उरमोडीच्या पाण्याने पिंगळी तलावात पाणी साठा झाला आहे. मात्र, विहीरींना पाणी कोठेच फुटले नाही.त्यामुळे पिंगळी तलाव पूर्ण भरणे गरजेचे आहे. या पाण्याने दहिवडी व गोंदवलेचा पाणी प्रश्‍न बर्‍याच अंशी सुटून शासनाचा टँकरचा खर्च कमी होईल.प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लगेच चारा छावण्या सुरू होणे गरजेचे आहे. पाणी व चारा नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पशुपालकाचे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने त्वरीत चारा छावण्या सुरू करणेे गरजेचे आहे.