Sat, Jan 23, 2021 07:07होमपेज › Satara › सेवागिरी रथावर ५८ लाखांची देणगी 

सेवागिरी रथावर ५८ लाखांची देणगी 

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 10:40PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

इतर राज्यासह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातून पुसेगावात आलेल्या  भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 58 लाख 43 हजार 852 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर  मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथावरील देणगीत 7 लाख 64 हजार 601 रूपयांची वाढ झाली आहे. दरम्यान रविवारी पुसेगाव ता. खटाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रथमिरवणुकी दरम्यान रथावर अमेरिका,इंग्लंडसह विविध देशातील  परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या गेल्या आहेत.

रथोत्सवाच्या दिवशी पहाटे पासूनच भाविकांची संख्या वाढत  होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती.सकाळी 11 वाजल्यापासून   गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला. यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांनी लाखो रूपयांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या. नोटाबंदीनंतर रथावर देणगी किती जमा होणार? याबाबत लोकांना उत्सुकता होती.

सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणूकीस बुधवारी सकाळी साडे दहा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री 10 वाजता मिरवणूक संपली. त्यानंतर रथावरुन नोटांच्या माळा व परदेशी चलन एकत्र करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव,योगेश देशमुख व अन्य पदाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. 

रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरता बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, न्यू सातारा समुह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-ऑप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चंट पतसंस्था, शिवशक्ती पतपेढी या वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वयंसेवकांनी  देणगी मोजण्याचे काम पाहिले. 

रथावर परकीय चलनाचा पाऊस

यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशातील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये थायलंडच्या  बाथ, युनायटेड अरब अमिरातीच्या धीरमच्या नोटा, कतारचा रियाल, युरो नोटा,इंग्लंडचे पौंड, यु.एस.ए. डॉलरच्या  नोटा, दुबईच्या  चलनी नोटा, कुवेत,इंडोनेशिया,सुदान,युके,झिम्बाब्वे, बांगलादेशच्याही चलनाचा समावेश आहे.