Sun, Aug 09, 2020 10:47होमपेज › Satara › गुढेकर बंधूंची तमाशात ‘डॉक्टरेट’ 

गुढेकर बंधूंची तमाशात ‘डॉक्टरेट’ 

Published On: Apr 04 2019 2:04AM | Last Updated: Apr 03 2019 10:35PM
कराडः  अशोक मोहने 

तमाशाचा खेळ सुरू असताना स्टेजच्या पाठीमागे लावलेल्या राहुटीत माझा जन्म झाला..कलाकारांच्या घोळा-मेळ्यात लहानाचा मोठा झालो..वाद्यांची ओळख झाली. बतावणी, गाणी, वगनाट्य करता करता तमाशात आयुष्य कसं गुंतत गेलं हे कळलच नाही. चार पिढ्या तमाशा जगणारे आणि लोककलेची मनोभावे सेवा करणारे चंद्रकांत गुढेकर व त्यांचे बंधू बबनराव गुढेकर सांगत होते..

चंद्रकांत गुढेकर व डॉ. बबनराव गुढेकर हे सख्खे सावत्र भाऊ. आजोबा पितांबर, शंकर, सीताराम यांनी आयुष्यभर लोककलेची सेवा केली. यांचा वारसा त्यांची पाच मुले पांडुरंग, बापुराव, बंडोपंत, हिंदुराव व विलास यांनी पुढे नेला. यातील बापुराव गुढेकरांची दोन मुले म्हणजे चंद्रकांत व बबनराव गुढेकर. 

चंद्रकांत यांचे शिक्षण पदवीपर्यंतचे तर बबनराव यांनी वैद्यकीय कोर्स करून वर्धा येथे खासगी प्रॅक्टीसही सुरू केली होती. पण या दोघांमध्येही कलेचे रक्त असल्याने त्यांनी लोककलेची मनोभावे सेवा करण्याचा निर्णय घेतला. 

वडील व चुलत्यांनी वीस -बावीस कलाकारांचा संच उभा केला. गावोगावी तमाशाचे कार्यक्रम करून त्यांनी कलावंतांची कुटुंब उभी केली. हाच वारसा चंद्रकांत व डॉ. बबनराव गुढेकर पुढे नेत आहेत. 

जन्मच तमाशाच्या राहुटीत झाल्याने आणि घरात कलेचा वारसा असल्याने चंद्रकांत गुढेकर लहान वयातच तमाशात काम करू लागले. पेटी, ढोलकी वाजवू लागले. अन्य ज्येष्ठ कलाकारांसोबत गण -गवळण, बतावणी यामध्ये भाग घेवू लागले. प्रेक्षकांचे मनोरंजन करू लागले. अभिनयाबरोबर गायनाची कलाही त्यांनी अवगत केली. अनुभवासाठी त्यांनी काळू -बाळू, मंगला बनसोडे, चंद्रकांत ढवळपुरीकर अशा लोकप्रिय तमाशा फडातही काम केले. हे करताना त्यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही. एक उत्तम कलाकार म्हणून ते तमाशा सृष्टीत नावारूपास आले. 

मध्यंतरी वांगी येथे तमाशा कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या मोटारसायकलला गंभीर अपघात झाला. ते कोमामध्ये गेले.काही दिवसांनी ते शुध्दीवर आले तेंव्हा त्यांच्या हातापायाची हालचाल पूर्ण बंद झाली होती. नीट बोलता येत नव्हते. तीन वर्षे ते अंथरूनावर खिळून होते. थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्यांनी पुन्हा पेटी व अन्य वाद्यांचा घरीच सराव सुरू केला. विशेष म्हणजे काही कालावधीतच ते पूर्ण बरे झाले. अपघातात झालेल्या दुखापतीमुळे पाय बरा झाला नाही, पण यावर मात करत त्यांनी पुन्हा रंगमंचावर तेवढ्याच जोशात पदार्पण केले आहे. आई-वडीलांचे आशिर्वाद आणि तमाशा कलेशी जोडली गेलेली नाळ यामुळेच लोककलेची सेवा करण्याचे भाग्य मिळाल्याचे ते सांगतात. 

त्यांचा भाऊ बबनराव गुढेकर यांनीही खडतर आयुष्यातून वाटचाल केली आहे. वैद्यकीय कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी वर्धा येथे तीन वर्षे खासगी प्रॅक्टीस केली. पण घरचा लोककलेचा वारसा त्यांना पुन्हा तमाशाच्या फडात घेवून आला. 

त्यांनी डॉ. बबनराव  गुढेकर  सह प्रल्हाद भोसले लोकनाट्य तमाशा फड उभा केला आहे. यामध्ये चंद्रकांत गुढेकर मॅनेजर म्हणून काम पहात आहेत. वीस पंचवीस कलाकांना सोबत घेवून हे बंधू लोककलेची इमाने -इतबारे सेवा करत आहेत. अशोक भोसले धोंडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संच तमाशाचे फड गाजवत आहे.