होमपेज › Satara › जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला घरघर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला घरघर

Published On: Jul 27 2019 1:32AM | Last Updated: Jul 26 2019 11:48PM
सातारा : प्रवीण शिंगटे

केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्वपूर्ण असणार्‍या जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेला अखेर घरघर लागली आहे. या यंत्रणेकडील अधिकारी व कर्मचार्‍यांची 43 पैकी 28 पदे कमी केली आहेत. केवळ 15 पदे निश्चित केली आहेत. या यंत्रणेमधील मनुष्यबळ कमी केल्याने घरकुल योजना,  महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानावर परिणाम होणार आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे सर्वासाठी घरे हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. पारधी आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना,  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात राबवल्या जात आहेत.पंडीत दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी कामे केली जातात.

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गट स्थापन करणे, त्यांना रोजगार, उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, अनुदान उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून होते. मात्र, ग्रामविकास विभागाने आता अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या कमी केल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होणार आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे अधिकारी व कर्मचार्‍यांची 43  पदे होती. मात्र, आता शासनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसाठी 15 पदे निश्चित करण्यात आली आहेत.केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा अल्प केंद्र हिस्सा तसेच वित्त विभागाने आकृतीबंध सुधारीत करण्याचे दिलेले निर्देश व सद्यस्थितीत कामाकरता पदांची आवश्यकता विचारात घेवून 15 पदेच यापुढे चालू ठेवावीत असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे. 

ग्रामविकास विभागाने निश्चित केलेल्या 15 पदांव्यतिरिक्त पदावरील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सेवा त्यांच्या मूळ अस्थापनेवर दि. 1 ऑगस्टपूर्वी प्रर्त्यापित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  यापुढे शासनाचे आदेश प्राप्त होईपर्यंत या पदावर कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती करू नये. अन्य पदावर कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत असल्यास त्यांना एक महिन्याची पूर्व सूचना नोटीस कालावधी देवून त्यांच्या  सेवाही समाप्त करण्यात याव्यात असेही ग्रामविकास विभागाने आदेशात म्हटले आहे.

डीआरडीएसाठी निश्चित केलेली पदे

प्रकल्पसंचालक 1, लिपिक टंकलेखक (कनिष्ठ सहाय्यक) 3, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण) 1, कनिष्ठ अभियंता 1, सहाय्यक लेखाधिकारी वर्ग-3 1, वरिष्ठ लेखा लिपिक 1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 1, कार्यालय अधिक्षक 1, वरिष्ठ सहाय्यक 1, वाहन चालक 1, शिपाई 2, संगणक ऑपरेटर (कंत्राटी तत्वावर)2 अशी 15 पदे कार्यरत राहणार आहेत.

योजनांचा गाशा गुंडाळला

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे विकास योजना निम्म्याही उरल्या नाहीत. संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना, पाणलोट क्षेत्र विकास,  अवर्षण प्रवर्षणक्षेत्र विकास, एकात्मिक पडीक जमीन विकास, हरियाली योजना या योजनांचा 5 ते 7 वर्षापूर्वीच गाशा गुंडाळला  आहे. त्यामुळे इंदिरा आवासच्या ऐवजी प्रधानमंत्री आवास आणि महिला सक्षमीकरण योजना सुरू आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची शासनाने पदे कमी केली असली तरी जिल्हा परिषदेच्या 64 गटात कंत्राटी समूह समन्वयकाची  नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
अविनाश फडतरे
प्रकल्प संचालक ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा