Wed, Jul 08, 2020 16:56होमपेज › Satara › बोराटवाडीत माढा लोकसभा मतदारसंघाची खलबते 

बोराटवाडीत माढा लोकसभा मतदारसंघाची खलबते 

Published On: Mar 04 2019 1:06AM | Last Updated: Mar 03 2019 11:01PM
खटाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असणार्‍या माढा मतदारसंघातील आजी-माजी आमदार आणि काही दिग्गज नेतेमंडळींची शनिवारी रात्री माण तालुक्यातील बोराटवाडीत मॅरेथॉन बैठक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बैठकीत गेल्या दहा वर्षांत खा. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीनेही मतदारसंघातील नेते आणि पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेतल्याची खंत व्यक्त करण्यात आल्याचे समजत आहे. पवार यांच्या आणि त्यानंतरच्या कार्यकाळात मतदारसंघाचे प्रश्‍न न सुटल्याने जनतेत असंतोष असल्याचे मतही बैठकीत प्रदर्शित करण्यात आले. जे काही करायचे ते सर्वांच्या विचाराने एकत्रितपणे करायचे, असा सूर काहींनी आळवल्याचे समजत आहे.  

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील दिग्गज मंडळींची शनिवारी रात्री आ. जयकुमार गोरे यांच्या  बोराटवाडी येथील निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आ. गोरेंसह सोलापूर जि. प. अध्यक्ष संजयमामा शिंदे, सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, सातारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, आणि उमेश परिचारक सहभागी झाले होते.

माढा मतदारसंघातून खा. शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यापासून सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा, माण-खटाव, फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. खा.पवार यांना लोकसभा निवडणूक सोपी जाणार की विरोधक जोर लावणार यावर तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. आघाडी झाली असली तरी पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्यावर अद्याप एकमत झाले नसल्याचे समजत आहे. 2009 मध्ये खा. शरद पवार 5 लाखावर मते मिळवून  याच मतदारसंघातून खासदार झाले होते. मात्र त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांची साधी विचारपूसही कुणी केली नव्हती. पवारांनी निवडणूकीत दिलेल्या अश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने जनतेतूनही असंतोष व्यक्त होत आहे. गत पाच वर्षात विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांंच्या कार्यकाळातही जनतेला दाखवण्यासारखे काही घडले नाही. खा. मोहिते-पाटील यांनाही 25 हजार इतके काठावरचे मताधिक्य मिळाले होते. आता मतदारसंघातील इच्छुकांची संख्या आणि इतर कुणाला तरी उमेदवारी दिल्यानंतर होणारा संभाव्य  उलटफेर याचा विचार करुन खा. शरद पवार यांंनी माढ्यातून स्वतःच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. खा. पवार स्वतः लढणार असल्याने आघाडीतील सर्व घटक एक दिलाने एकत्र येतील. पवार पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने लोकसभेत जातील असेच चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माढा मतदारसंघात काहींच्या कोल्यांट्यांनी चित्र बदलले आहे. आता तर माढ्यातील दिग्गजांचे वारंवार एकत्र येणे सुरु झाले आहे. पवारांची उमेदवारी जाहीर होण्याअगोदर दोन महिन्यांपूर्वी टेंभूर्णीत एक बैठक होवून सर्वसंमतीने एक उमेदवार देण्याचे ठरवण्यात आले होते. आता पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही माढ्यातील दिग्गज पुन्हा एकदा एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बैठकीत  माढ्यातील सर्वच विधानसभा  मतदारसंघातील सध्याच्या  परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. फलटणमध्ये रणजितदादा, माणमध्ये जयाभाऊंची भूमिका महत्वाची रहाणार आहे. तिकडे संजयमामा स्वतःच उमेदवारी करणार का विरोधी भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यावर भूमिका स्पष्ट करणार यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत.  गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील नेत्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याची खंतही काहींनी बैठकीत बोलून दाखवली. बोराटवाडीत झालेल्या बैठकीवरुन पवार माढ्यातून लोकसभा लढवण्याचे निश्‍चित झाले असले तरी सारे काही आलबेल आहे असे वाटत नाही.