कराड ः प्रतिनिधी
माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील मतभेद मिटले पाहिजेत. काँग्रेस त्यामुळे अधिक बळकट होईल. पण याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण हे जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य असेल. वाद मिटला तर आपण त्यावर शिक्कामोर्तब करू, हीच आपली भूमिका असल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सोमवारी सकाळी खटावकडे रवाना झाली. तत्पूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना खा. अशोकराव चव्हाण यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, आ. विश्वजीत कदम, आ. आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर आणि आ. पृथ्वीराज चव्हाण गटातील मतभेद सर्वश्रुत आहेत. या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांच्या मनोमिलनासाठी आपण प्रयत्न करणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विलासराव पाटील - उंडाळकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काँग्रेसच्या विचार प्रवाहापासून अजूनही दूर गेलेले नाहीत. मात्र सातारा जिल्ह्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारानेच निर्णय घेतले जातील. उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटात मनोमिलन झाल्यास त्याचा पक्षाला फायदाच होणार असून त्याचा आपणासही आनंद होईल. मात्र या प्रकरणी निर्णयाचे अधिकार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनाच असून तो जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य असेल. याप्रश्नी वाद मिटल्यानंतर आपण केवळ शिक्का मारण्यापुरते काम करू, असेही खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाबा काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टात टोलवला चेंडू
उंडाळकर व चव्हाण गटातील मतभेद मिटल्यास जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारानेच कृती होते, असे सूचित करत खा. अशोकराव चव्हाण यांनी विलासराव पाटील - उंडाळकर गटाशी असलेले मतभेद मिटवण्याबाबतचा चेंडू आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टात ढकलला असून आता आ. चव्हाण यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.