Thu, Jun 24, 2021 10:43होमपेज › Satara › राजेंचे रॅलीद्वारे सातार्‍यात शक्‍तीप्रदर्शन

राजेंचे रॅलीद्वारे सातार्‍यात शक्‍तीप्रदर्शन

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 02 2019 12:52AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले हे पुन्हा रिंगणात उतरले असून आज त्यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी शिवेंद्रराजे भोसले यांनीही सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी दाखल केली. तत्पूर्वी दोन्ही राजांची सातार्‍यातून एकत्रितपणे विराट रॅली काढण्यात आली. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्र पक्षाचे पदाधिकारी यावेळी रॅलीत सहभागी झाले होते. 

श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभा व लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली असून मंगळवारी श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी गांधी मैदान ते पोवई नाका अशी विराट रॅली काढून जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले.

रॅलीपूर्वी उदयनराजे जलमंदिरवरून बाहेर पडून स्वतः शिवेंद्रराजे यांना आणण्यासाठी सुरुचीकडे गेले. तेथून त्यांना घेऊन ते गांधी मैदान येथे आले. त्यावेळी ढोल-ताशा, तुतारी, फटाक्याची आतषबाजी आणि एकच राजे उदयनराजे, एक नेता एक आवाज बाबा महाराज, बाबा महाराज, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत गांधी मैदान येथून रॅलीला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या गाडीत दोन्ही राजे एकत्र उभे होते. या रॅलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, माजी आमदार कांताताई नलावडे, ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, महेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ही रॅली गांधी मैदान राजवाडा येथून सुरू झाली.  मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालयमार्गे पोवईनाका अशी  काढण्यात आली. पोवई नाका येथे पोहचल्यावर दोन्ही राजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, रॅली गांधी मैदान येथून पोवई नाक्याकडे मार्गस्थ होत असताना दोन्ही राजेंचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी एका व्यावसायिकाने दोन्ही राजेंना पेढयाने आंघोळ घातली.

शिवेंद्रराजेंचा प्रांत कार्यालयात अर्ज दाखल 

सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्‍ला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत ना. चंद्रकांत पाटील, श्री.छ. उदयनराजे भोसले, कांताताई नलावडे, विक्रम पावस्कर, सौ. वेदांतिकाराजे भोसले, अशोक गायकवाड उपस्थित होते. 

उदयनराजेंचा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल 

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  श्‍वेता सिंघल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत ना. चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, कांताताई नलावडे, विक्रम पावस्कर, अशोक गायकवाड उपस्थित होते.