Wed, Sep 23, 2020 08:39होमपेज › Satara › धक्कादायक! सातार्‍यात ‘सिव्हिल’मध्ये भ्रूण हत्या

धक्कादायक! सातार्‍यात ‘सिव्हिल’मध्ये भ्रूण हत्या

Last Updated: Aug 04 2020 11:40PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये स्वच्छता कामगारांना दोन मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भ्रूण हत्या रोखण्याचे काम ज्या विभागातून व्हायला हवे, त्याच सिव्हिलमध्ये भ्रूण हत्येचा प्रकार घडल्याचे व्हिडीओद्वारे समोर आल्याने जिल्हा हादरला आहे. या संतापजनक प्रकारामुळे सातारा सिव्हिल सर्जन डॉ. आमोद गडीकर यांच्या कारभाराबद्दल सर्वसामान्य जनतेत चीड निर्माण झाली आहे. 

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी, सिव्हिलच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये रविवारी स्वच्छतागृहाचे ड्रेनेज चोकअप झाल्याचे समोर आले. यामुळे स्वच्छता कामगारांना पाचारण करण्यात आले. स्वच्छता कामगारांनी ड्रेनेजची पाहणी केली. वरील बाजूस एक वस्तू दिसत असल्याने हँडग्लोव्हज घालून व तोंडाला मास्क बांधून ते बाहेर काढले. चोकअपमधील बाहेर काढले जात असताना त्याचा व्हिडीओ बनवला गेला आहेे. तो व्हिडीओ सुमारे 49 सेकंदाचा आहे. व्हिडीओमधील दृश्ये थरकाप उडवून देणारी व संतापाची लाट निर्माण करणारी आहेत.

सापडलेल्या भ्रूणामध्ये एक भ्रूण पूर्ण तयार झालेले तर दुसरे भ्रूण सडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहेे. मंगळवारी सायंकाळी या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सिव्हिल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एकीकडे कोरोना संसर्गामुळे सिव्हिलसह जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले असतानाच सिव्हिलमध्ये मृत मानवी भ्रूण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. मृत भ्रूण स्त्री जातीचे की पुरुष जातीचे? नेमके किती भ्रूण आहेत? घटना नेमकी कधी घडली आहे? आतापर्यंत सिव्हिलकडून तशी नोंद झाली आहे की नाही? ड्रेनेजमध्ये सापडल्याने प्रकरण दाबले जात आहे का? यामध्ये रॅकेटचा समावेश आहे का? नेमके काय झाले आहे? एक भ्रूण पक्व असल्याने त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया करणे गरजेचे होते? मग तसे का झाले गेले नाही? भ्रूण सापडल्यापासून त्याबाबतचे कोणाकोणाला रिपोर्टिंग झाले आहे? वरिष्ठ अधिकार्‍यांकडून हे प्रकरण दाबले जात आहे का?

‘सीएस’चा असंवेदनशील कारभार...

मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धी माध्यमांना ही घटना समोर आल्यानंतर सिव्हिलचे कारभारी सी.एस. डॉ. अमोद गडीकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोनची रिंग होऊन देखील फोन उचलला नाही. कोरोना कालावधीत सिव्हिलच्या कारभाराचे वारंवार वाभाडे निघत आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोरही वारंवार सिव्हिलच्या कारभाराबाबत वाभाडे निघाले आहेत. चारच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी सिव्हिलमध्ये जाऊन सिव्हिलची पाहणी करून सीएस यांना कारभार सुधारण्याची तंबी दिली होती. चार दिवसांनंतर मात्र मृत मानवी भ्रूण सापडल्याने सिव्हिल किती असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय समोर 
आला आला आहे.

 "