Fri, Apr 23, 2021 14:22होमपेज › Satara › कराड : वाढीव दराने पेट्रोल-डिझेलची विक्री करणाऱ्यावर गुन्हा

कराड : वाढीव दराने पेट्रोल-डिझेलची विक्री करणाऱ्यावर गुन्हा

Last Updated: Mar 26 2020 7:55PM
कराड : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशभर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले होते. परंतु, पेट्रोल पंपावर वाढीव दराने पेट्रोल डिझेलची विक्री केल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी एका पंपावर कारवाई केली. संबंधित पेट्रोल पंपाचा कामगार, मॅनेंजर व मालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली असून संकटाच्या कालावधीतही सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अधिक वाचा : सातारा : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग 

ओगलेवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथील सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे विक्रेते, मॅनेंजर व मालक यांच्यावर जादा दराने पेट्रोल-डिझेलची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश, पहिला रूग्ण सापडला

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा सुविधा शासनाच्या वतीने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये किराणामाल दुकानदार व पेट्रोल पंप यांचाही समावेश आहे. पेट्रोल पंप सुरू ठेऊन गरजेनुसार लोकांना पेट्रोल, डिझेल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी व नियम घातले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटी व नियम भंग करून ओगलेवाडी येथील सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावर ग्राहकांना जादा दराने पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात होती. याबाबत तक्रारी आल्यानंतर व कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित पेट्रोल पंपावर छापा टाकला. त्यानंतर खात्री करून पंपाच्या कामगारांसह मॅनेजर व मालकावर कारवाई केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून सरकार पक्षातर्फे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून फिर्याद देण्यात आली आहे.

अधिक वाचा : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी