Sat, Nov 28, 2020 15:35होमपेज › Satara › वनविभागाच्या हद्दीतील वृक्षारोपणात भ्रष्टाचार

वनविभागाच्या हद्दीतील वृक्षारोपणात भ्रष्टाचार

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 12 2019 11:34PM
चाफळ : राजकुमार साळुंखे 

चाफळ विभागाबरोबरच उरुल, यराडवाडी, नवसरी, मल्हारपेठ येथील वनक्षेत्रात वनविभागाने गेल्या काही वषार्ंपासून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र या उपक्रमावर शंका उपस्थित झाल्या असून हजारो झाडे लागण केल्याचे दाखवून लाखो रुपयांची बिले मजुरांच्या नावे काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

नियमानुसार खड्डे काढले आहेत का? त्यात झाडे लावली आहेत का? किती झाडे लावली त्यातील किती जगली. किती वेळा झाडांना पाणी घातले गेले असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी चाफळ विभागातील जाळगेवाडी, डेरवण, जाधववाडी, माथणेवाडी, भैरेवाडी, वाघजाईवाडी, खोनोली, कोचरेवाडी, माजगांव तसेच उरुल, यराडवाडी, नवसरी, मल्हारपेठ मंडल  येथील वनखात्याच्या हाद्दीत गेल्या चार वर्षांपासून मोठ्याप्रमाणात वनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने करोडो रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र शासनाने खर्च केलेल्या निधीतून खरंच वनीकरण केले आहे का? त्यापैकी किती झाडे जगली, जगलेल्या झाडांना कडक उन्हाळ्यात पाण्याची काय सोय केली गेली, लागण केलेली झाडे आगीपासून वाचण्यासाठी काय उपाय योजना केल्या आदी सवाल जनतेने उपस्थित केले आहेत.  कामाची देय रक्कम मजुरांना आदा केल्याचे दाखवून निधी हडप केल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. तक्रारीनुसार तेथे पाहणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी नुकतीच पाहणी केली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. येथील कामांची वस्तुस्थिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे माजगांव, चाफळ, माथणेवाडी, उरुल, बहिरेवाडी,  जाळगेवाडी, नवसरी, यराडवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे. 

कामे पारदर्शक झाल्याचा दावा..

याबाबत चाफळ, मल्हारपेठ वनक्षेत्रपालांशी संपर्क साधला असता पाटण तालुक्यातील वनविभागाने केलेले काम पारदर्शक आहे. तालुक्यासह चाफळ, उरुल , यराडवाडी विभागातील ज्या -ज्या ठिकाणी वनीकरण करण्यात आले आहे ते शासनाच्या नियमानुसार करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.