होमपेज › Satara › नगरपरिषद करण्याचा ‘शब्द’ मुख्यमंत्र्यांनी तोडला?

नगरपरिषद करण्याचा ‘शब्द’ मुख्यमंत्र्यांनी तोडला?

Published On: Apr 22 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 10:06PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया गतीने सुरू असून प्रभाग रचना जाहीर झाल्याने गेली दोन वर्षांपासून सुरू असलेल्या नगरपरिषद घोषणेच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी कराड दौर्‍यावर येऊन जाहीर सभेत केलेली घोषणा हवेतच विरली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर नगरपंचायतीने सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने नगरपरिषदेसाठी आवश्यक असणारा आकृतिबंध तयार करूनही व लोकसंख्या आणि इतर सर्व तयारी होऊनही मलकापूरला नगरपंचायतच राहणार असल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

मलकापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले तेव्हापासून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या वाढ 40 टक्केच्या जवळपास असून ती इतर शहरांच्या वाढीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे ‘क’ वर्ग नगरपरिषदेत रूपांतर होणे गरजेचे होते. गतवेळी झालेल्या निवडणुकीवेळीच मलकापूरची लोकसंख्या 25 हजारांपेक्षा जास्त असतानाही त्यापूर्वी केलेल्या जनगणनेमुळे नगरपंचायत म्हणूनच निवडणूक झाली. त्यानंतर सुमारे दोन वर्षांतच मलकापूर नगरपरिषदेची घोषणा होईल, असे बोलले जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दौर्‍यावर येऊन मलकापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत लवकरच मलकापूर नगरपरिषदेची घोषणा केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे सध्याच्या सत्ताधार्‍यांना ग्रामपंचायतीप्रमाणे अर्ध्यावरच सत्ता सोडून पुन्हा नगरपरिषदेसाठी निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तसे झाले नाही.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून दोन वर्षे होत आलेतरी अद्याप त्याची अंमलबजाणी झाल्याचे दिसून येत नाही. बरं शासनाने नगरपरिषद म्हणून मलकापूरचा आकृतीबंधही जाहीर केला आहे. काही दिवसांपुर्वी शासनाने तसा अद्यादेश काढला असल्याने ही निवडणूक नगरपरिषदेचीच होईल, असे सर्वांना वाटत होते. त्याबाबतची सर्व पुर्तताही झाली असून नेमकं घोड आडले कुठे? हे माहीत असूनही कोणीच जाहीरपणे बोलत नाही. ज्यांनी नगरपरिषद व्हावी, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तेही या विषयावर सध्या शांत असल्याचे दिसून येत आहे.  

सध्या मलकापूरची लोकसंख्या सुमारे 31 हजार 500 च्या आसपास आहे. तर त्यामुळे ‘क’ वर्ग नगरपरिषद होण्यास काहीच हरकत नाही. त्यातच शासनाने अद्यादेश काढून मलकापूर नगरपरिषद म्हणून आकृतीबंध जाहीर केला. मात्र, प्रत्यक्ष नगरपरिषदेचा दर्जा मिळण्यासाठी कोठे आडकाठी आली हे समजून येत नाही.  नगरपरिषद न जाहीर करता नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने ही निवडणूक झालीच तर त्यानंतर लगेचच म्हणजे काही दिवसातच नगरपरिषदेची सर्व प्रक्रिया पुर्ण होऊन नगरपरिषद जाहीर होईल आणि पुन्हा मलकापूरला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल. त्यासाठी होणारा खर्च, जाणारा वेळ व इतरही बाबींचा विचार करून आताच नगरपरिषद जाहीर करावी, अशी विविध पक्ष, संघटना व नागरिकांची अपेक्षा असतानाही ती जाहीर होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.  

कराड दौर्‍यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द का पाळला नाही?, कोणाच्या दबावाला बळी पडून ते नगरपरिषदेची घोषणा करण्याचे टाळत आहेत?, जर नगरपरिषदेची घोषणा केली तर त्याचा भाजपाला फायदा होईल की तोटा?, आरक्षण काय पडेल? आरक्षण काहीही पडले तरी मलकापूरवर भाजपाचा झेंडा फडकेल का? तो फडकावयाचा असेल तर काय रणनिती आखली पाहिजे? याचा सारासार विचार करून काही लोकांनी मंत्र्यांना नगरपरिषदेची घोषणा न करण्याची विनंती केल्याचे बोलले जात आहे. संबंधित मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकल्यानेच नगरपरिषदेची घोषणा होत नसल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यामुळे जर ही अफवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत नगरपरिषदेची घोषणा करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.  

नगरपरिषदेसाठी जनहित याचिका...

मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद करून तशी घोषणा निवडणुकीपूर्वी करावी, अशा आशयाची जनहित याचिका काही नागरिकांकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या 31 हजारांपेक्षा जास्त असून नगरपरिषद होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता झाली असल्याने व येथील लोकांच्या मागणीचा व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाचा विचार करून मलकापूर नगरपरिषदेची घोषणा निवडणुकीपूर्वी केली जावी, असेही जनहित याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

 

Tags : satara, karad, Malkapur news, Gram Panchayat, Municipal Panchayat,