Fri, Sep 25, 2020 11:23होमपेज › Satara › मनोहर शिंदेंचा करिष्मा अन् काँग्रेसचा दिग्वीजय

मनोहर शिंदेंचा करिष्मा अन् काँग्रेसचा दिग्वीजय

Published On: Jan 30 2019 1:34AM | Last Updated: Jan 29 2019 10:48PM
कराड : अमोल चव्हाण

मलकापुरात काँग्रेसने सत्ता कायम राखली असून लोकांनी विकासाच्या बाजूने कौल देताना खालच्या पातळीवर झालेल्या आरोपांना झडकारले. विधानसभेची रंगीत तालीम असलेल्या मलकापूरच्या निवडणुकीत भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गोळाबेरीज केल्याचे फलित त्यांना मताच्या टक्केवारीवरून मिळाले. तर काँग्रेसने मलकापुरातील अस्तित्व उंडाळकर गटाच्या मदतीने कायम ठेवले. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा त्यांचे शिष्य मनोहर शिंदे यांनी कायम ठेवली असून मलकापूरचा विजय म्हणजे शिष्याने गुरूला दिलेली भेट आहे.

मलकापूर नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि भाजपमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अगदी नगरपालिका स्थापन होण्यापासून अनेक गोष्टींवर चर्चा झाली. कोण कोणाबरोबर जाणार? कोणाची आघाडी होणार? कोणाची युती होणार? या गोष्टी मलकापूरमध्ये शेवटपर्यंत चर्चेत राहिल्या. काँग्रेसने उंडाळकर गटासह समविचारी लोकांना बरोबर घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्याच वेळेला भाजपानेही विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यामध्ये  उंडाळकर गटाच्या काही शिलेदारांसह राष्ट्रवादीचेही काही मोहरे अलगतपणे भाजपाच्या जाळ्यात आडकले. तसेच शिवसेनेनेही भाजपाला येथे साथ दिली. काँग्रेसने मलकापूरची सत्ता कायम ठेवण्यासाठी उंडाळकर गटाशी हातमिळवणी करत केलेले प्रयत्न त्यांना निर्विवाद यशापर्यंत घेऊन गेले.

त्याचवेळी भाजपने केलेली गोळाबेरीज विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असली तरी मलकापूर निवडणुकीत हा फॅॅक्टर पूर्ण यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही. तरीही भाजपाचा मलकापूर निवडणुकीत वाढलेला मतांचा टक्का हा निश्‍चितच काँग्रेसला विचार करायला लावणारा आहे.मलकापूर निवडणुकीत अनेक घटना घडामोडी घडल्या. यामध्ये डॉ. अतुल भोसले म्हणजेच भाजपाचा प्रभाव असलेल्या आगाशिवनगर विभागात काँग्रेसने मुसंडी मारली. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग दोन व आठ मध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. प्रभाग 1 मध्ये शंकरराव चांदे यांनी आपला पुतण्या प्रशांत चांदे यांना विजयी करत आपले वर्चस्व कायम ठेवताना भाजपच्या पाठिंब्यावर उभा असलेल्या शिवसेनेच्या नितीन काशिद यांना पराभूत केले. प्रभाग दोनमध्ये मोठा जनसंपर्क असतानाही माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे यांच्यासह काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. मोहन शिंगाडे यांचा पराभव काँग्रेसला व मनोहर शिंदे यांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. गेली अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्याचा लोंबकळत पडलेला प्रश्‍न येथे कळीचा मुद्दा ठरला. तो रस्ता का व कोणामुळे रखडला? हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात काँग्रेस कमी पडली व त्याचा फटका त्यांना बसला. दुसरीकडे भाजपाने उंडाळकर गटातून भाजपमध्ये आलेल्या माजी नगराध्यक्षांना उमेदवारी देऊन येथील दोन्ही उमेदवार विजय केले. प्रभाग 3 काँग्रेसने आपल्या ताब्यात कायम ठेवत असताना त्यांनी येथील आपले अस्तित्व कायम ठेवले. येथे मुळ राष्ट्रवादीच्या असलेल्या पण भाजपाच्या चिन्हावर उभा राहिलेल्या उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग 4 मध्ये भाजपाने मनसेचे दादा शिंगण यांच्या पाठबळावर काँग्रेसची चांगलीच दमछाक केली.

भाजपाने येथे आयात उमेदवार न देता स्थानिक उमेदवाराचा विचार केला असता तर कदाचित निवडणुकीत आणखी रंगत निर्माण झाल्याचे पहायला मिळाले असते. येथे चिठ्ठीच्या माध्यमातून नियतीनेही काँग्रेसला साथ दिली. तर प्रभाग 5 हा काँग्रेस व भाजपासाठी समसमान ठरला. प्रभाग 6 मध्ये काँग्रेसने आपला वरचष्मा कायम ठेवला. प्रभाग सातमध्ये डॉ. अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक व विश्‍वासू हणमंतराव जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या नवख्या पण मनोहर शिंदे यांच्या तालमीत डावपेच शिकलेल्या दत्ता पवार यांनी त्यांना धूळ चारली. यामध्ये सागर निकम या अपक्ष खेळाडूची अप्रत्यक्षपणे दत्ता पवार यांना चांगलीच साथ मिळाली. प्रभाग 8 मध्ये अशोकराव थोरात यांनी भाजपच्या झेंड्याखाली व डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे येथे काँग्रेसला मोठा फटका बसला. संपूर्ण निवडणुकीत प्रभाग 9 हा काँग्रेसच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा व निर्णायक ठरला. या प्रभागामध्ये भाजपाने अनेक डावपेच खेळून काँग्रेस व मनोहर शिंदे यांची ताकद खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मनोहर शिंदे यांनी केलेली विकास कामे व प्रत्येकाशी असलेला थेट संबंध या जोरावर त्यांना या प्रभागात मोठे यश मिळाले. मनोहर शिंदे यांनी स्वतःबरोबर या प्रभागातील काँग्रेसच्या इतर दोन उमेदवारांनाही मोठ्या फरकाने विजयी केले. 

मलकापूर निवडणुकीत भाजपाने कराड प्रमाणेच संपूर्ण राज्यभरातील पॅटर्न राबवत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर भर दिला होता. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचाच विजयी होईल, असे भाजपाचे नेते व कार्यकर्ते शेवटपर्यंत सांगत होते. एक ते आठ प्रभागाच्या मतमोजणी दरम्यान तशी परिस्थितीही निर्माण झाली होती. 1 ते 8 प्रभागांमध्ये मतमोजणी वेळी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अपवाद वगळता काँग्रेसच्या उमेदवार पेक्षा पुढे होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष भाजपाला आणि बहुमत काँग्रेसला मिळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु 9 नंबर प्रभागाचा निकाल जाहीर होऊन या प्रभागातील काँग्रेसचे तिन्ही उमेदवार सुमारे हजार मताधिक्याच्या फरकाने विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.