Tue, Jul 07, 2020 09:12होमपेज › Satara › सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक - निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार  

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक - निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार  

Published On: Mar 23 2019 3:15PM | Last Updated: Mar 23 2019 3:17PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा व माढा लोकसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे माढा मतदार संघासह जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. माढा मतदार संघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप उमेदवाराबाबत उत्कंठा लागून राहिली असतानाच शनिवारी फलटनमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली.  काही महिन्यांपूर्वीच त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला होता. लोणंद येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेस बैठकीत निंबाळकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र शनिवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी सायंकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना माढा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळणार का?  याबाबतच्या चर्चांना आता उधाण आले आहे.