Tue, Jun 15, 2021 11:32
गायत्री कंपनीवर जप्तीची कारवाई शक्य

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

सातारा : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या  उत्खननासाठी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस 5 लाख 15 हजार 915 ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिले आहेत. या कंपनीने रॉयल्टी न भरल्यास वाहने जप्तीची कारवाई होऊ शकते, असा इशारा अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिला आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग  विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सातार्‍यात खंबाटकी घाटात नव्या बोगद्याचे काम सुरू आहे. हे काम गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या कंपनीने घेतले 

आहे. या ठेकेदार कंपनीने आतापर्यंत केलेल्या गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्वधन  (रॉयल्टी) व दंडात्मक रक्कम भरलेली नाही. याबाबत खंडाळा तसेच वाई तहसीलदारांनी वेळोवेळी नोटीसा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही या कंपनीने केलेल्या उत्खननासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन एका पत्रकार परिषदेवेळी दिले होते.

वाई तहसीलदार रणजित भोसले यांनी दिलेल्या नोटिशी विरोधात संबंधित कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर कोर्टाने हे आदेश नसून नोटीस आहे.

 याबाबत वाई तहसीलदारांकडे आपले म्हणणे सादर करावे. तहसीलदारांनी म्हणणे ऐकूण आदेश पारित करावेत, असे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार  तहसीलदारांसमोर सुनावणी झाल्यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे गौणखनिज उत्खनाचे स्वामित्व धन व दंडापोटी संबंधित कंपनीला 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये भरण्याचे आदेश वाई तहसीलदारांनी दिले. या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीवर पुढील कारवाई प्रस्तावित करणे आवश्यक होते. मात्र तसे झाली नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीला इशारा दिला आहे. या कंपनीला रॉयल्टी व दंडाची रक्कम भरावी लागेल. अन्यथा त्यांची वाहने जप्त करावी लागतील, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी दंडाचे आदेश दिल्यामुळे पुढील कारवाई तातडीने करणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिरंगाई केल्यास कारवाईत अडथळा येण्याची शक्यता आहे. प्रशासन त्याची वाट तर बघत नाही ना? असा सवाल केला जात आहे.दंड भरला नाही, आदेश मानत नाहीत मग काम का बंद करत नाहीत?

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या  उत्खननासाठी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस दंड करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही दंडाची रक्कम भरण्यात आली नाही. असे असतानाही विस्तारीकरणाचे काम मात्र सुरूच आहे. दंड भरला नाही, प्रशासनाचे आदेश मानले जात नाहीत, मग काम का बंद केले जात नाही? असा संतप्त सवाल खंडाळा तालुक्यातील जनतेने केला आहे.