Tue, Jul 07, 2020 17:41होमपेज › Satara › सातारा : कोरोनाच्या जागृतीसाठी वासुदेव आला... (video)

सातारा : कोरोनाच्या जागृतीसाठी वासुदेव आला... (video)

Last Updated: Mar 19 2020 5:47PM
मसूर (सातारा) : पुढारी वृत्तसेवा

मसूरचे विद्यमान सरपंच पंकज दीक्षित यांच्या अभिनव कल्पनेतून उपसरपंच विजयसिंह जगदाळे व सर्व सदस्यांच्या सहकार्याने कोरोनाच्या जनजागृतीसाठी थेट वासुदेवाची स्वारी मसूरमध्ये साकारली. 

चंद्रकांत कदम या युवकाच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या उपक्रमासाठी व जनजागृतीसाठी सरपंच दीक्षित यांनी सनी कवळे (पाली) येथील कलाकारास पाचारण केले व अभिनव उपक्रमाची कल्पना दिली. या कलाकाराने यावी उपक्रमास तात्काळ संमती दिली व वासुदेवाच्या वेषात जनजागृती करण्यास सुरवात केली. 

मसूरमध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी वासुदेवाची स्वारी दारोदारी फिरत आहे. कोरोनाची धास्ती घेतलेल्या जनतेमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवत लोकांच्यातील भीती दूर करण्यात वासुदेव यशस्वी झाले आहेत. 

गीतकार शंकर उमापे यांनी गीत रचून साथ दिल्याने या अभिनव उपक्रमाचे ठिकठिकाणी स्वागत व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने दारोदारी गुनगुणलेले गीत असे...

कोरोना घालवायला मसूरमध्ये आली वासूदेवाची स्वारी ।।धृ!!

चिनमधी त्याचा जन्म झाला

साऱ्या जगाचा तो वैरी झाला.

बघता बघता तो भारतात आला.

आजुन उपाय सापडना त्याला.

सगळ्या औषधाला पडलाय भारी.

कोरोनाला घालवायला मसूर मध्ये आली वासुदेवाची स्वारी !!१!!

पण भिऊ नका दादा माऊली त्याला.

शिंकताना खोकताना रुमाल धरा तोंडाला.

सर्दी, ताप,खोकला, दावा सरकारी डॉक्टरला.

निरोगी राहतील घरातली मंडळी सारी.

कोरोना घालवायला मसूर मध्ये आली वासूदेवाची स्वारी !!२!!

टि व्ही च्याच बातम्या बघत रहायच.

मोबाइलच्या खोट्या मेसेजला न्हाय घाबरायच.

गर्दीच्या ठिकाणी कुणी न्हाय फीरायच.

मित्रांना लांबनच नमस्कार करुन भेटायच.

भाजी,अंडी,मटण.चांगली शिजवायची सारी.

कोरोना घालवायला मसूर मध्ये आली वासूदेवाची स्वारी !!३!!       

या अभिनव उपक्रमाचे मसूर वस्त्यांमध्ये स्वागत झाल्यानंतर अजून तीन दिवस हा उपक्रम राबवण्याचा संकल्प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सोडला आहे.