Wed, Jul 08, 2020 09:13होमपेज › Satara › संगणक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

संगणक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:10PMउंडाळे : वैभव पाटील

महाराष्ट्रभर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायत स्तरावर संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) प्रकल्प राबविण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीसाठी महाऑनलाईन कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या संगणक परिचालकांची प्रशासन व कंपनीने बोळवणच केली आहे. दहा महिन्यांपासून या कर्मचार्‍यांचे पगार रखडले आहेत. 

आपले सरकार ही योजना आघाडी सरकारने सन 2016 ला महाऑनलाईन कंपनीशी करार संपताक्षणी 11 ऑगस्ट 2016 रोजी शासनाकडून नवीन निर्णय निर्गमित करण्यात आला. संग्राम केंद्राऐवजी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत मागील संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना सामावून घेणे गरजेचे होते. शासनाने आर्थिक उत्पन्नाच्या निकषावार ग्रामपंचायत क्ल्सटर निर्माण करून सेवा केंद्रांची संख्या कमी केली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. 

तालुक्यात जवळ पास एकूण 100 हून अधिक संगणक परिचालकांची ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रावर नियुक्ती झाली आहे. शासनाच्या नवीन योजना, प्रकल्प यामध्ये काम करण्याचे कंपनी व प्रशासनाकडून फक्त आदेश दिले जातात. 

संगणक परिचालकांचे मानधन, कंपनी व्यवस्थापन, स्टेशनरी व तांत्रिक बाबी यासाठी लागणारा निधी मागील काही महिन्यात कंपनीच्या खात्यावर व जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग केला गेला. तर मागील दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावरून जुलै 2017 ते जून 2018 पूर्ण वर्षभराची रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग करूनही संगणक परिचालकांना मानधन मिळत नाही. मानधनात वेगवेगळ्या कारणाने कपात, तालुका समन्वयक व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मनधनाविषयी चुप्पी यावरून वेगळेच दृश्य समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

संगणक परिचालक कंपनी व प्रशासन या दोन्हींच्या कोंडीत सापडल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय कर्मचार्‍यांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम कामकाजावरही होत आहे. कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.