Mon, Jul 06, 2020 18:41होमपेज › Satara › युती, आघाडी भाकरीच्या करपलेल्या दोन बाजू : प्रकाश आंबेडकर 

'युती, आघाडी भाकरीच्या करपलेल्या दोन बाजू'

Published On: Apr 22 2019 1:35AM | Last Updated: Apr 22 2019 1:35AM
कराड : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. देशाचे कुटुंबप्रमुख म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांची सत्ता पुन्हा आल्यास लुटालुटीचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी यापेक्षा वेगळी नाही. त्यांच्याकडे 70 वर्षे देशाच्या जनतेने सत्ता दिली; मात्र त्यांना विकास करता आला नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काय किंवा भाजपा-शिवसेना युती काय या भाकरीच्या करपलेल्या दोन बाजू आहेत. असा घणाघात करत त्यांना फेकून देण्याची वेळी आली असून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कराड येथे सातारा लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रा. सुकुमार कांबळे, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, प्रा. पार्थ पोकळे, चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, महेंद्र कांबळे, दादासोा कांबळे, विशाल भोसले, अशोक देवकांत, ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात घराणेशाहीच्या हातात सत्ता आहे. घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता भोगत असताना लोकांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाही संपवून सर्वसामान्य माणसांच्या हातात पहिल्यांदाच सत्ता देऊया. सर्व सामान्य माणसाची सुख-दु:खे, अडीअडचणी ही सर्वसामान्यांनाच माहित असतात. त्यामुळे केंद्रातील सत्ता सर्वसामान्यांच्या हातात असणे गरजेचे आहे. आतापर्यंत ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी सर्वसामान्य लोकांना केवळ मतदानापुरते वापरून घेतले. त्यांना कंटाळलेल्या जनतेने गत निवडणुकीत मोदींच्या हातात सत्ता दिली. सत्तेवर आल्यानंतर मोदी व त्यांचे समर्थक खोटे बोलत आहेत. देशावर ज्या-ज्यावेळी हल्ला झाला. त्या-त्यावेळी त्याला आपल्या सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु मोदी व त्यांचे समर्थक 300 मारले, असे म्हणून खोटे बोलत आहेत. त्यांनी स्वप्नात मारले असावेत, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. 

पंतप्रधान खुर्चीवरती बसून तुम्ही खोटे कसे काय बोलू शकता? पंतप्रधान हा देशाचा असतो. तो खोटे बोलला तर जगात आपण भारतातील सर्व नागरिक खोटे बोलल्यासारखे आहे. त्यामुळे खोटे बोलणारांना सत्तेवरून बाजूला करा. खोटारड्यांना खुर्चीवरून खाली खेचा. आपण भारत देश एक कुटुंब मानतो, अशा परिस्थितीत खोटे बोलणारा पंतप्रधान कुटुंबप्रमुख होण्याच्या लायकीचा आहे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.