Wed, Jul 08, 2020 11:10होमपेज › Satara › आ. बाळासाहेब पाटील यांंच्या विरुद्ध आक्षेपार्ह लिखाण

आ. बाळासाहेब पाटील यांंच्या विरुद्ध आक्षेपार्ह लिखाण

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 24 2019 11:43PM
कराड ः प्रतिनिधी

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारावर कारवाई करावी अशी मागणी करत आ. पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात सुमारे 4 तास ठिय्या मांडला. जोपर्यंत कारवाई होत नाहीत तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हालणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आ. बाळासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिल्यानंतर रात्री उशीरा पोलिस ठाण्याच्या आवारातून जमाव पांगला. 

साप्ताहीक ग्रामअभियान या साप्ताहीकाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून या ग्रुपचे अ‍ॅडमिन दिपक तात्याराव माने आहेत. या ग्रुपवरती आ. बाळासाहेब पाटील यांच्याबाबत वैयक्‍तिकरित्या आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखाण  करून ते पोस्ट केल्याप्रकरणी दिपक तात्याराव माने याच्यावर कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील शुक्रवार दि. 24 रोजी सायं. 4 च्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, जयंत पाटील, प्रकाश पाटील या बंधुंसह उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे हे पोलिस ठाण्यात आल्याची माहिती वार्‍यासारखी कराड शहर व कराड उत्तर मतदारसंघात पसरली. त्यामुळे कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेऊ लागले. काही वेळातच पोलिस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

आ. पाटील पोलिस ठाण्यात आल्याचे समजताच डीवायएसपी नवनाथ ढवळे त्वरीत पोलिस ठाण्यात आले. त्यांनी आ. पाटील यांचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्री 8 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच होती. पोलिस ठाण्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा वाढल्याने तणाव निर्माण झाल्यानंतर आ. पाटील व डीवायएसपी यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना घरी जाण्याची विनंती केली.  डीवायएसपी नवनाथ ढवळे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिस या घटनेच्या मुळाशी जाऊन जे कोणी यामध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करतील. 

आ. पाटील व डीवायएसपी यांचे कोणतेही म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत कार्यकर्ते नव्हते. संबंधीतावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हालणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. कार्यकर्त्यांचा संताप वाढत होता. पोलिस व आ. बाळासाहेब पाटील यांनी विनंती करूनही कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या आवारातून हालले नाहीत. रात्री आठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याचा आवार भरलेला होता. 

संबंधीत दिपक माने याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आ. बाळासाहेब पाटील हे पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. जात असताना त्यांनी पोलिसांनी कार्यकर्त्यांचा उद्रेक लक्षात घेऊन याचा तपास करावा असे सांगितले. त्यानंतर कार्यकर्तेही पोलिस ठाण्याच्या आवारातून बाहेर पडल्याने तणाव निवळला. 

संबंधितावर कडक कारवाई करा: आ. पाटील

कराड उत्तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीजण हिन पातळीवर जाऊन चांगल्या चाललेल्या संस्थांसह माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत संस्थांवरती आक्षेपार्ह लिखाण केले जात होते. परंतु आत्ता माझ्यावरती वैयक्‍तिक पातळीवर जाऊन अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण केले आहे. काहीवेळेला मी आजारी असल्याच्या अफवाही पसरवल्या जात होत्या. माझ्याबाबत हिन दर्जाचे बदनामीकारक लिखाण करणार्‍यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. त्याला पाठीशी घालणाराचा शोध घेऊन त्यालाही शिक्षा करावी. यामध्ये पोलिसांवरती दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशी मागणी आ. बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.