होमपेज › Satara › शिकार करून खाणार्‍यांची आमची औलाद : शिवेंद्रराजे

शिकार करून खाणार्‍यांची आमची औलाद : शिवेंद्रराजे

Published On: Sep 15 2019 6:41PM | Last Updated: Sep 16 2019 2:07AM
सातारा : प्रतिनिधी
माझ्या कुठल्याही संस्थेची किंवा साखर कारखान्याची चौकशी सुरू नाही, तरीही या चौकशीमुळे मी भाजपमध्ये गेलोय, अशी खोटी माहिती माझ्या भाजप प्रवेशासंदर्भात दिली जात आहे. सातार्‍यात आलेल्या एका यात्रेदरम्यान, ‘मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी भाजपात गेलात’, अशी टीका माझ्यावर केली. आम्हाला कुणाच्या तुकड्याची गरज नाय. तुकड्यावर आमचं चालत नाही आणि भागतही नाही. तुकड्यांवरची नाही शिकार करून खाणार्‍यांची आमची औलाद आहे, अशा शब्दांत भाजपचे सातारा जिल्ह्याचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या विरोधकांवर तोफ डागली.

सातार्‍यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर भाजपच्या जनादेश यात्रेत शिवेंद्रराजे बोलत होते. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे. माझी कसलीही चौकशी सुरु नाही. तसे असेल तर उपस्थिती मंत्री महोदयांनी तसे सांगावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सातारा शहर व तालुक्याचा विश्‍वास आहे. गेल्या 50-60 वर्षांत जे झालं नाही ते भाजप सरकारने पाच वर्षांत करुन दाखवलं.

छत्रपती शिवराय, समर्थ, कर्मवीर आणि शूरवीरांचा जिल्हा आगळावेगळा आहे. जिल्ह्याकडे वेगळ्यापध्दतीने लक्ष द्यावे. पंधरा वर्षे राष्ट्रवादीत काम केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सातारा व जावलीत काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी सातार्‍यात आलेल्या एका यात्रेत माझ्यावर आरोप झाले. ‘मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी भाजपमध्ये गेलात’, अशी टीका केली गेली. पण त्यांना सांगू इच्छितो, तुकड्यावरची आमची औलाद नाही. तुकड्याची आम्हाला गरज नाही. तुकड्यावर आमचं चालत नाही आणि भागतही नाही. त्यांना वेगळ्या पध्दतीने सांगावे लागेल. भाजमध्ये येण्यासाठी मी  स्वत:साठी काहीच मागितलेले नाही.

भाजपात नसतानाही मुख्यमंत्र्यांनी जावलीतील 54 गावांचा पाणीप्रश्‍न सोडवणार्‍या बोंडारवाडी योजनेच्या कामाला 50 कोटींची प्रशासकीय मान्यता  दिली.सातार्‍यातील एमआयडीसीत प्रकल्प आले तर तरुणांना रोजगार मिळेल. मेडिकल कॉलेज तातडीने सुरु झाले पाहिजे.   सातारा हद्दवाढीचा निर्णय घ्यावा. शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत. ऐतिहासिक अजिंक्यातारा किल्ल्यावर शिवसृष्टी झाली पाहिजे. लावंघर उपसा सिंचन योजनेचे काम व्हावे. प्रसिध्द कास पठाराचे संवर्धन होवून जिल्ह्यात पर्यटन वाढले पाहिजे.

राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करावी, या मागण्या लोककल्याणाच्या आहेत. याशिवाय कोणताही स्वार्थ ठेवून मी निर्णय घेतलेला नाही. मेगाभरती म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून लोक भाजपात येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून भाजपचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न असेल, असा विश्‍वासही शिवेंद्रराजेेंनी व्यक्‍त केला. यावेळी नगरसेवक, जि.प.पं.सं.चे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्री. छ. उदयनराजे भोसले, मंत्री ना. गिरीष महाजन, ना. बाळा भेगडे, ना. दिपक पवार, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, कांताताई नलावडे, मदनदादा भोसले, माधवी कदम, डॉ. दिलीप येळगावकर आदि प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची मैत्री सदैव राहावी...

शिवेंद्रराजेंनी राजकीय भूमिका स्पष्ट करत शेरोशायरी केली. ते म्हणाले, ‘मै अकेलाही चला था जाने दे मंझिले अगर, लोग जुडते गए और कारवाँ बढता गया’, असा शेर पेश केला. त्यांना मंचावर उपस्थित मान्यवरांसह गर्दीने दाद दिली. त्याचवेळी शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल भावना व्यक्‍त करताना ‘मुस्कान का कोई मोल नहीं होता, रिश्तों का कोई तोल नहीं होता, दोस्त तो मिल जाते है राह पर, लेकीन हर कोई आप के जैसा अनमोल नहीं होता’, अशा शब्दांत भावना व्यक्‍त केल्या. शिवेंद्रराजेंच्या शेरोशायरीला गर्दीने टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली. चंद्रकांतदादांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री सदैव राहावी या दोनच माझ्या वैयक्‍तिक मागण्या आहेत, असे शिवेंद्रराजे म्हणाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याला दाद दिली.