Sat, Jul 04, 2020 01:34होमपेज › Satara › सीएस’ची चौकशी होणार

सीएस’ची चौकशी होणार

Published On: Sep 06 2019 1:44AM | Last Updated: Sep 06 2019 1:44AM

file photoसातारा : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील) 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणात संशयित क्‍लार्क अमित राजे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन झाला असून, पुढील तपासासाठी त्याला दर सोमवारी एसीबी विभागात हजेरी लावण्याचे आदेश झाले आहेत. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) डॉ. अमोद गडीकर यांची एकदा चौकशी झाल्यानंतर त्यांना आणखी पुढील तपासासाठी एसीबी विभागात बोलवले जाणार आहे. यामुळे याप्रकरणाचा तपास सुरुच राहणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अशोक शिर्के यांनी दिली.

वाई येथील हॉस्पिटल परवाना नूतनीकरण व सोनोग्राफी मशीन नोंदीसाठी तक्रारदार सिव्हील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना क्‍लार्क अमित राजे याने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार दिली. एसीबी विभागाने याबाबत पडताळणी केली असता संशयित क्‍लार्क अमित राजे याने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. यावरून एसीबी विभागाने शनिवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच अमित राजे नाट्यमयरीत्या पसार झाला. तो सापडत नसल्याने एसीबी विभागाने शनिवारीच सीएस डॉ.अमोद गडीकर यांची चौकशी केली. थेट सिव्हील सर्जनची लाच प्रकरणात चौकशी झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर डॉ.अमोद गडीकर यांना सोडून देण्यात आले. एसीबी अमित राजे याचा शोध घेत असताना तो बुधवारी सापडला. एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या जबाबाकडे लक्ष लागले आहे. मात्र हा तपास गोपनीय राहणार असून भविष्यात तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अमोद गडीकर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवणार का? याबाबत विचारले असता ‘तपासासाठी सीएस यांना बोलवणार असल्याचे’ एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले. यामुळे सिव्हील लाच प्रकरणाचा तपास सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.