Sat, Dec 05, 2020 23:43होमपेज › Satara › एड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा

एड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रवीण शिंगटे

प्रभावी जनजागृतीमुळे एड्सचा विळखा आता सैल झाला असला तरी अजुनही एड्सच्या रुग्णांची संख्या आढळून येत असून त्याविरोधात आता निर्णायक लढा उभारला जात आहे. राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेंतर्गत येणार्‍या एडस नियंत्रण विभागाने त्यासाठी आराखडा निश्‍चित केला असून सातारा जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक खासगी व सहकारी कंपन्यांच्यामार्फत एम्लॉई लिड मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यात एड्स हद्दपारीसाठी प्रभावी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

1 डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. यंदा या वर्षाची संकल्पना ‘राईट टू हेल्थ’ ही असून ‘माझे आरोग्य माझा अधिकार’ हे घोषवाक्य निश्‍चित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रामुख्याने पारदर्शकता, जबाबदारी व भागीदारी यावर भर दिला जाणार असून  या अनुषंगाने एच. आय. व्ही. एड्स निर्मूलनाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाजगी व सहकारी कंपन्यांच्यामार्फत एम्लॉई लिड मॉडेलची संकल्पना राबवली जाणार आहे. त्याअनुषंगाने खाजगी कंपन्यातील कामगार एड्सबाबत जनजागृती करणार आहेत. बैठका घेणे, जागृती फेरी, संबंधित रुग्णांचे मनोबल वाढवणे यासह विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. 

शासनामार्फत एच आय व्ही. एडस विषयक माहिती, समुपदेशन, तपासणी व उपचाराची सुविधा मोफत दिल्या जातात. या सुविधा प्रभावीपणे लोकापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. या सुविधांचा सकारात्मक परिणाम साधत एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या व्यक्तीचे आरोग्य व जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न एड्स नियंत्रण विभागाद्वारे केला जाणार आहे.  एड्स बाधितांना शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

एच.आय.व्ही. एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी शुक्रवार, दि. 1 रोजी एडस जनजागृती रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा न्यायाधीशांच्या  हस्ते होणार आहे.

‘माहितीयुक्‍त गाव’ ही संकल्पना राबवणार 

एड्स नियंत्रण विभाग ‘माहितीयुक्‍त गाव’ ही संकल्पना सातारा जिल्ह्यात राबवणार आहे. त्यानुसार या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांची निवड करण्यात आली आहे. या संकल्पनेमध्ये गावातील सर्व लोकांना  एच. आय. व्ही. एड्स विषयी माहिती देण्यात येणार आहे. या संकल्पनेचा मूळ उद्देश किमान 90 टक्के एच आय व्ही संसर्गिताना लवकर तपासणी करून शोधणे व त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. त्यादृष्टीने एड्स निर्मूलनामध्ये निर्णायक योगदान देणार असल्याची माहिती समन्वयक हेमंत भोसले यांनी दिली.