Mon, Sep 21, 2020 18:51होमपेज › Satara › माळवाळी येथील खून प्रकरणी दोघे ताब्यात

माळवाळी येथील खून प्रकरणी दोघे ताब्यात

Last Updated: Feb 14 2020 11:08PM
मसूर : पुढारी वृत्तसेवा
माळवाडी (ता. कराड) येथील महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात उंब्रज पोलिसांना यश आले असून बारा तासांच्या आत या प्रकरणात दोघा संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सौ. तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अजय गोरड व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला. 

काशिनाथ गोरख काळे (वय 29) व त्याची बायको अनिता काशिनाथ काळे (वय 26, दोघे रा. ओगलेवाडी, हजारमाची) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी ः माळवाडी येथील सौ. सुमन शेलार या यादववाडी हद्दीत उसाच्या शेतात  जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून त्यांना दगडाने ठेचून गंभीर जखमी करून खून करण्यात 

आला होता. तसेच  मृतदेह  यादववाडी व माळवाडी गावांमधून वाहणार्‍या ओढ्यातील करंजाच्या झाडास पाण्यात सुटलेल्या मुळ्यांना सुरुंगाची तार व अंगावरील साडीने पाण्यात पालथ्या स्थितीत बांधून ठेवला होता. 

या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते.  दरम्यान संशयित आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. कानातील दागिनेही कान तोडून नेले होते. 

संशयित आरोपींनी शांत डोक्याने व कोणताही पुरावा मागे न ठेवण्याचा  प्रयत्न केला होता. खुनाचे गांभिर्य ओळखून संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा, गुन्हे अन्वेषण पथक कराड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

दरम्यान शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास एका खबर्‍यामार्फत सदर गुन्ह्यातील संशयित करवडी ता. कराड येथे मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उंब्रज पोलिस ठाण्याचे कर्मचारी पो.कॉ. मयूर देशमुख, दत्ता लवटे, पो.कॉ.अमोल देशमुख यांनी धाव घेतली. त्यांनी शिताफीने संशयितास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सदर गुन्हा बायकोच्या मदतीने केला असल्याची कबुली त्याने दिली. 

गुन्ह्याची फिर्याद मयत सौ. सुमन यांचा दीर नानासो विष्णू शेलार रा. माळवाडी यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिली आहे.  पुढील तपास उंब्रज पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अजय गोरड करीत आहेत. 

दरम्यान संशयित आरोपींनी कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटमारीचा प्रकार केला असल्याची कबुली दिली आहे.गुन्हा उघडकीस  आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सौ. सातपुते, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. साबळे, स.पो.नि. गोडसे, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखा, महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील यांचेसह उंब्रज पोलिस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा सातारचे कर्मचारी, कराड उपविभाग कार्यालय कर्मचारी, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी मदत केली. 

 "