Sat, Aug 08, 2020 02:33होमपेज › Satara › राष्ट्रवादीत मोठा भूकंप, उदयनराजे भाजपमध्ये जाणार

राष्ट्रवादीत मोठा भूकंप, उदयनराजे भाजपमध्ये जाणार

Published On: Aug 20 2019 10:30PM | Last Updated: Aug 21 2019 1:02AM
सातारा : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेले काही दिवस आपली भूमिका ‘सस्पेन्स’ ठेवणार्‍या उदयनराजेंनी अचानक वेगळी ‘मूव्ह’ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेचा राजीनामा देवून विधानसभेबरोबरच पोटनिवडणुक लढवण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत झाल्याचे वृत्त आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उदयनराजे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्रत्वाचे संबध राहिले. उदयनराजेंच्या इच्छेखातर मुख्यमंत्र्यांनी सातार्‍यात छप्पर फाडके निधी दिला. उदयनराजेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर राहिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी खा. शरद पवारांच्या उपस्थितीत उदयनराजेंचे तोंडभरून कौतुक केले. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती. मात्र, शरद पवारांच्या प्रेमापोटी व देशात आणि राज्यातील तळागाळात असलेल्या परिस्थितीचा विचार करून उदयनराजेंनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. राष्ट्रवादीचे मजबूत केडर जिल्ह्यात असल्याने आपण तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊ असे उदयनराजेंना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात उदयनराजेंचे मताधिक्क्य घटले. देशात व राज्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीची वाताहत झाली.

राज्यात एका बाजूने भाजपकडे ‘इनकमिंग’ सुरू झाले असताना सातार्‍यात एका पाठोपाठ एक राष्ट्रवादीचा ‘मोहरा’ बाहेर पडत होता. आगामी राजकारणाची चाहूल बघून उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले तातडीने भाजपवासी झाले. त्या पाठोपाठ लगेचच विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले. वास्तविक या दोघांपेक्षाही उदयनराजेंची व मुख्यमंत्र्यांची जास्त जवळीक त्यामुळे गेल्या काही दिवसात मौन बाळगून असणार्‍या उदयनराजेंनी अचानक आपली ‘मूव्ह’ बदलली. गेले काही दिवस ते राजकीय अभ्यासकांमार्फत चाचपणी करत होते. लोकसभेची निवडणुक आणि विधानसभेची निवडणुक एकत्रित होवू शकते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देवून निवडणुकीला पुन्हा उभे राहू शकता येते का? या सर्व बाबींची माहिती अंतर्गतरित्या घेतली जात होती. मंगळवारी रात्री 8.30 वाजता उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लोकसभेचा राजीनामा देवून विधानसभेवेळी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक कशी घेता येवू शकते? याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यांच्या या मूव्हमुळे आपल्या राजकीय विरोधकांना एकाच डावात चेकमेट करण्याचा उदयनराजेंचा ‘प्लॅन’ दिसत असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवते.