Thu, Jul 02, 2020 11:08होमपेज › Satara › भुईंज बसस्थानकाची अखेरची घटका

भुईंज बसस्थानकाची अखेरची घटका

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 9:14PMभुईंज : जयवंत पिसाळ

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यात भुईंज हे महत्वाचे बसस्थानक आहे. मात्र, याकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने हे बसस्थानक अखेरची घटका मोजत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने प्रस्ताव देऊन नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नवीन विभाग नियंत्रक सागर पळसुले भुईंजला न्याय देणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

महामार्गावर शिरवळ ते सातारा दरम्यान व वाई तालुक्याच्या पुर्व भागात केंद्रस्थानी असणारे भुईंज बसस्थानक आहे. मात्र, याची अवस्था आता असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. एका बाजूला महामार्गाचे झालेले सहापदरीकरण व उड्डाणपुल यामुळे या बसस्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस येतच नाहीत. त्यामुळेच खासगी वाहतूक फोफावली आहे. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव देवून सुद्धा विभाग नियंत्रकांनी याला फक्‍त वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांना सातारा येथे शिक्षणासाठी जात असताना पासची सवलत आहे. परंतु, एस. टी बसेस भुईंजमध्ये थांबतच नसल्याने या सुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे पालकांच्या खिशाला आर्थिक भुईंड सहन करावा लागत आहे. तर  चालकांना मिळणार्‍या चिरीमिरीमुळे नियम पायदळी तुडवून भुईंज परिसरात खासगी हॉटेल्सवर  बसेस तासन तास थांबलेल्या असतात. याबाबत वारंवार तक्रार होत असूनही ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था झाली आहे. साताराहून भुईंजला येताना महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरदार यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

भुईंज येथे वाईच्या पूर्व भागातील प्रवाशांची संख्या जास्त असते. रात्री 10 पर्यंत प्रवासी बसस्थानकात असतात. तरीही प्रवाशांना अंधारातच उभे रहावे लागते. जो काही विद्युत पुरवठा आहे तो फक्‍त नियंत्रकाच्या कार्यालयापुरताच आहे. तर स्वच्छतागृह व शौचालय नावापुरते राहिले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांना नाकाला रूमाल लावावा लागत आहे.  स्वच्छता नसल्याने प्रवाशांना कचर्‍यामध्येच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. 

पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कधी भिंत पडते, कधी पत्रा उडतो अशी परिस्थिती गेली अनेक वर्षे असून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. विभाग नियंत्रकांच्या  इच्छाशक्‍तीअभावी भुईंज बसस्थानकावर अन्याय झाला आहे. मध्यंतरी भुईंजला नवीन बसस्थानक होेणार असे ऐकण्यात आले होते. मात्र, यावर काहीच कार्यवाही न झाल्याने एकही गोष्ट मिळालेली नाही. दुरूस्तीच्या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास प्रवासी संघटना, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्यावतीने तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लांब पल्ल्याच्या बसेस थांबणार तरी कधी?

सातार्‍याहून भुईंजला दैनंदिन प्रवास करणारे नागरिक आहेत. रात्री कधी उशिरा झाला तर भुईंजची बस नसते तर लांब पल्ल्याच्या बसेस भुईंजमध्ये थांबत नाहीत, त्यामुळे वाईमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या नैराश्यातूनच चार महिन्यांपूर्वी एका युवतीने आत्महत्या केली होती. यानंतरही महामंडळाने काहीच बोध घेतलेला नाही. त्यामुळे प्रवासी संतप्‍त झाले असून भुईंजमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस थांबणार तरी कधी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.