Mon, Jul 06, 2020 19:02होमपेज › Satara › औषध फवारणी करताय? सावधान..!

औषध फवारणी करताय? सावधान..!

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:45PMसातारा : योगेश चौगुले

शेतातील पिके चांगली व्हावीत, उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शेतकर्‍यांकडून पिकांवर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र, ही फवारणी करताना शेतकर्‍यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. कीटकनाशक नाक, तोंडावाटे शरीरात गेल्याने धोका उद्भवू शकतो. यासाठी फवारणी करताना योग्य ती काळजी घेऊन सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतीची कामे बहुतांशी आटोक्यात आली आहेत. शेतातील पिकावर रोग पडू नये यासाठी औषधांची फवारणी करण्यावर शेतकर्‍यांनी जोर दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पिकांचा रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी रासायनिक खतासह किटक नाशकांची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. या कीटकनाशकांमुळे शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येवून ठेपला आहे. 
दरम्यान, अनेक शेतकर्‍यांना फवारणी करताना दक्षतेबद्दलची माहिती नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यातच सातारा कृषी विभागाला जनजागृतीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. नेहमी प्रमाणे शेतकर्‍यांना मार्गदर्शन व जनजागृती करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झालेे आहे. याचा त्रास शेतकर्‍यांना होत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कृषी विभाग जागा होणार का? असा संतप्‍त सवाल जाणकारांमधून विचारला जात आहे. यापूर्वी कीटकनाशक औषध फवारणी करताना राज्यात काहीठिकाणी विषबाधा होवून अनेक शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अप्रमाणित किटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून मोठे धोके आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोहचत नाही. तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत तिथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर पोहचला आहे.

पिकांवर औषध फवारणी करण्याआधी औषध फवारण्याच्या किटवर असलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. औषध विक्रेत्याने सुचवल्याप्रमाणे औषधाची मात्रा घेवून फवारणी करावी. तसेच मिश्रण पंपात भरण्यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. फवारणी करताना धुम्रपान टाळावे, नोझल बंद पडल्यास तोंडाने फुंकर मारु नये. रिकामे डब्बे नष्ट करावेत. विक्रेत्यांनी वैध मुदतीत असणार्‍या कीटकनाशकांची विक्री करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

...कशी घ्याल काळजी

मिश्रण तयार करताना हात मोजे आणि तोंडाला मास्क लावणे गरजेचे.
वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.
पाऊस येण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर फवारणी करु नये.
फवारणी केल्यानंतर शेतात जाणे टाळावे.
विषबाधेचे लक्षण दिसून आल्यास प्राथमिक उपाय करावेत.
आजारी व्यक्तीने कीटकनाशकांची फवारणी करु नये.
फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. 
फवारणी करताना पूर्ण अंग झाकलेले असावे.
फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरु नये.       
फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून दूर धरावे. जेणेकरुन कीटकनाशक अंगावर पडणार नाहीत.