Tue, Jul 14, 2020 05:12होमपेज › Satara › बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर

बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:17PM- सतीश मोरे
 

पंढरीच्या पाडुरंगाच्या भेटीचा ध्यास खुप दिवसापासुन, महीन्यापासून, नव्हे काहीनी तर खुप वषार्ंपासून होता. पाडुरंगाचे नित्य स्मरण होते, भेटीची आस पण होती, पण योग जमत नव्हता. यावेळी त्याचं बोलावणं आलं आणि पंढरीच्या वारीला निघालो. सोळा दिवस त्याचे स्मरण करत वैष्णव आज पंढरीत पोहचले. विठोबाच्या कळसाचे दर्शन झाले अन सर्वांचे चेहरे खुलले. पाडुरंगा, आलो तुझ्या चरणी. मी नाही वारी केली,  तु वारी करवून घेतलीस, असा कृतार्थ भाव वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर आज दिसला. आळंदी ते पंढरपूर पायी वारीला सहा जुलैला  प्रारंभ झाला.  ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनानंतर वारकरी तेथेच विसावले.

दुसर्‍या दिवशी सुरू झालेला पायी वारीचा महायज्ञ अखंड सुरू होता. शनिवारी माऊली पालखी सोहळा वाखरीला विसावला. तुकोबारायांच्या पालखी सहीत अनेक पालख्या वाखरीला मुक्कामाला होत्या. माउली सोहळ्यात पालात मुक्कामाचा शेवटचा दिवस असल्याने वारकरी गेल्या पंधरा दिवसापासून कसे चाललो,  काय केले, काय वाटले याचे अनुभव कथन करत जागले.  वारकर्‍यांनी लवकर उठून वाखरीत विसावलेल्या माऊली आणि तुकाराम महाराज पालखी व अन्य संत महात्म्याच्या पालखी दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या. इकडे सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीत सुमारे 10 लाखावर भाविक दाखल झाले आहेत. दुपारी एक एक करून पालख्या पंढरीकडे जाऊ लागल्या. माऊली पालखी वाखरी हून निघाली. वाखरीचा ओढा ओलाडल्यानंतर परंपरेप्रमाणे माऊली पालखी रथातून उतरवून श्री भाटे यांच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान वडार समाजाचा आहे.

माऊली माऊली जयघोष करीत वीसबावी येथे पोहचल्यावर तिसरे उभे रिंगण झाले. सायंकाळी माऊली पालखी सोहळा पंढरीत पोहचला. माऊली पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर यानी माऊली पादुका रथातून काढून सरदार शितोळे यांच्या गळ्यात दिल्या. हा क्षण अनेकांनी डोळ्यात साठवून ठेवला. माऊली माऊली माऊली माऊली जयघोष, नामसंकीर्तन याने आता अजून जोर धरला होता. दिड्यांमधून वाटचाल करीत सरदार शितोळे यानी माऊली पादुका नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात आणल्या. 

समाज आरती झाल्यानंतर वारकरी मुक्कामास गेले. काही जण चंद्रभागा वाळवंटात गेले तर काही दर्शन बारीकडे गेले, पंढरीत पोहचल्यावर वारकरी लोकांच्या उत्साहाला उधाण आले.  विठ्ठला, पाडुरंगा वारी पुर्ण झाली नव्हे तर तू करवून घेतलीस.  वारीत चालताना सर्व काळ फक्त तुझे नाम ओठावर होते. भगवंताच्या प्रेमामुळे वारीत काही कमी पडले नाही. वारीत उन्हाचा त्रास होऊ लागला की माऊलीने कधी थंड हवा पण सुरू केली तर मधूनच हलका पाऊस सुरू केला. वारीला येणे आणि ती पुर्ण होणे कोणालाही जमत नाही,  त्यासाठी पुण्याई लागते. वाराणसी गया काशी सर्व होईल मात्र पंढरीची वारी करणारा खरा पुण्यवान, कारण येथे वारीमध्ये सर्व संताचे दर्शन होते. तीर्थ, क्षेत्र आणि देव फक्त पंढरीत आहे, वारीत आहे आणि तो फक्त वारकरी पाहू शकतो. जगात विठ्ठल हा एकच देव आहे ज्याच्या पायाला हात लावून दर्शन घेता येते. विठ्ठलाची वारी, पंढरीची वारी केली याचा आनंद सर्वाच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. इकडे पंढरपूर मध्ये दिवसभर राज्याभरातील विविध भागांतून लाखोंच्या संख्येने भाविक येत होते. संत मुक्ताई,  संत तुकाराम, संत चोखोबा, संत गाडगेबाबा यासह अनेक संताच्या नावाच्या पालखीचे पंढरीत आगमन झाले. पंढरीत जिकडे पाहावे तिकडे फक्त वैष्णव जन दिसत होते. वारकर्‍यांचा आनंद चेहर्‍यावर पहावयास मिळत होता. सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. ज्या पंढरीची वाट बघत होतो ती पंढरी आली, आपण आळंदीतून पंढरीला आलो, मुक्ताईनगर येथून इतक्या लांब पंढरपूरला आलो, सासवड येथून आलो, असे वारकरी एकमेकांना सांगत होते. सगळीकडे टाळ, चिपळ्या,  मृदंग आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष ऐकू येत होता.
पावलों पंढरी वैकुंठभुवन ।
धन्य आजि दिन सोनियाचा ॥
पावलों पंढरी आनंदगजरें ।
वाजतील तुरे शंख भेटी ॥
पावलों पंढरी क्षेम आलिंगनी।
संत या सज्जनीं निवविलें ॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा ।
भेटला हा सखा मायबाप ॥
पावलों पंढरी येरझार खुंटली ।
माउली वोळली प्रेमपान्हा ॥
पावलों पंढरी आपुलें माहेर ।
नाहीं संवसार तुका ह्मणे ॥