Sat, Jul 04, 2020 02:34होमपेज › Satara › आ. जयकुमार गोरेंना मोक्‍कांतर्गत अटक करा : डॉ. येळगावकर

आ. जयकुमार गोरेंना मोक्‍कांतर्गत अटक करा : डॉ. येळगावकर

Published On: Dec 03 2018 1:43AM | Last Updated: Dec 02 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

आ. जयकुमार गोरे यांनी एका जमीन व्यवहारात 10 कोटी रूपये मागितल्यामुळे मतदारसंघाची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. त्यांचे अनेक कारनामे काळे  फासणारे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. तसेच आ. जयकुमार गोरे यांच्यावर मोक्‍काअंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. येळगावकर म्हणाले,  आ. गोरे यांनी 10 कोटीं रूपये मागितल्यामुळे मतदारसंघाची त्यांनी अब्रू राज्यात घालवली आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. हे प्रकरणही मोठे असल्याने त्यांच्यावर मोक्‍कांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी. ते बाहेर राहिल्याने साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. याबाबत 5 महिन्यांपूर्वीच तक्रार दाखल झालेली आहे. मात्र, पनवेल पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानेच अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

या प्रकरणात आ. गोरे यांच्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेकांचा समावेश आहे. पैशाच्या दबावामुळे 5 महिन्यानंतरही या प्रकरणात गन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. 

येळगावकरांनी ऐकवली ऑडिओ क्‍लिप

डॉ. दिलीप येळगावकर यांनी  पत्रकार परिषदेदरम्यान आ. जयकुमार गोरे व त्यांचे पीए विशाल बागल यांचे तक्रारदार गोसावी यांच्यासोबत जे संभाषण झाले त्याची ऑडीओ क्‍लिप ऐकवली. यामध्ये आ. जयकुमार गोरे व गोसावी यांचे संभाषण झाले असून  त्यामध्ये‘ हो, मी आमदार जयकुमार गोरे बोलतोय’ असे गोरे म्हणत  आहेत. यावेळी आ. गोरे यांच्याकडून गोसावी यांच्यावर 10 कोटी रूपये देण्यास दबाव टाकला जात असल्याचे स्पष्ट झाल्याचे डॉ. येळगावकर यांचे म्हणणे आहे  तर आ. गोरे यांचे पीए बागल यांनीही गोसावी यांना फोन करून ‘हा व्यवहार 14 कोटींचा झाला आहे तर यामध्ये  भागीदारी द्या नाही तर 7 कोटी द्या’ अशी मागणी केल्याचेही डॉ. येळगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.