होमपेज › Satara › दुष्काळ उठलाय पशुपक्ष्यांच्या जीवावर

दुष्काळ उठलाय पशुपक्ष्यांच्या जीवावर

Published On: Apr 06 2019 1:51AM | Last Updated: Apr 06 2019 1:51AM
शिंगणापूर : वार्ताहर

माण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीने रौद्ररूप धारण केले असून यावर्षीचा दुष्काळ पशुपक्ष्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. अन्नपाण्यासाठी शेळ्यांमेंढ्या, वानरटोळ्यांसह पशुपक्षांची तडफड सुरू आहे. शिंगणापूरनजीक पाण्याच्या शोधात भटकणार्‍या दोन कोल्ह्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने वन्यप्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे.

माण तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून तालुक्यातील मोठे तलाव, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यातील 80 टक्के जनतेला पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचीही अन्नपाण्यासाठी तडफड सुरू आहे.  पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाची धडपड सुरू आहे. यासाठी मेंढपाळ स्थलांतर करत आहेत. चारा छावण्या सुरु करण्याबाबतचा निर्णय शासन दरबारी प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिंगणापुरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वानरटोळ्यांनाही अन्नपाण्यासाठी भटकंती करावी लागत असून वानर टोळ्यांनी आपला मोर्चा मानवीवस्तीकडे वळवला आहे. अन्नपाण्यासाठी  वानरटोळ्या आक्रमक होत असून घरात घुसून वानरे अन्नपदार्थ घेऊन पलायन करत आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून पाण्यासाठी पशुपक्ष्यांना भटकावे लागत आहे. तसेच रानटी प्राणीही अन्नपाण्यासाठी रात्रीच्या वेळी भटकत असल्याचे दिसून येत आहे.  दुष्काळामुळे पशुपक्षांची तडफड सुरू असतानाच दुष्काळ वन्यप्राण्यांच्या जीवावर उठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

प्राणिसंपदा जतन करण्याची गरज...

माणसांप्रमाणेच माणदेशातील पशुपक्षीही दुष्काळाशी लढा देत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करणारे पशुपक्षी, शेळ्यामेंढ्या, वानरटोळ्या यांच्यासाठी स्थानिक नागरिकांनी किमान पाण्याची सोय केल्यास त्यांची होणारी तडफड थांबणार आहे. शिंगणापूर मंदिर परिसरासह अन्य ठिकाणीही वानरटोळ्या व पशुपक्षी यांच्यासाठी पाणवठ्याची सोय करून प्राणिसंपदा जतन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमीतून होत आहे.