Sat, Aug 08, 2020 02:11होमपेज › Satara › दोन दशकाचे राजकीय शत्रू एकत्र

दोन दशकाचे राजकीय शत्रू एकत्र

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 10:31PM

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी

लोणंदच्या समाजकारणाचे नगरपंचायत निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांनी वाटोळे केले. चाळीस वर्षात तालुक्यात जे घडले नाही ते काम त्यांनी केले. गावागावात भावकी, जाती-जातीत भांडणे लावून राजकीय स्वार्थ साधत आहेत. लोणंदच्या विकासकामात नगराध्यक्षांनी आमदारांना बाजूला ठेवून धाडसी पाऊल टाकल्यास काँग्रेसचा पाठींबा राहील, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी केले. दरम्यान, दोन दशके राजकीय शत्रु असणारे आनंदराव शेळके व अ‍ॅड. बागवान प्रथमच भुमिपूजन निमित्ताने जाहीर एकत्र आल्याने व आ. मकरंद पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याने लोणंदच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

लोणंद नगरपंचायतीच्या वतीने विविध प्रभागांमध्ये मंजुर झालेल्या विविध विकासकामांच्या भुमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. बाळासाहेब बागवान बोलत होते. यावेळी माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके - पाटील, नगराध्यक्षा  स्नेहलता शेळके - पाटील, महिला बालकल्याण सभापती हेमलता  कर्णवर, राजेंद्र डोईफोडे, मेघा शेळके, सचिन शेळके, लिलाबाई जाधव, शैलजा खरात उपस्थित होते.

अ‍ॅड. बागवान म्हणाले, नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील यांनी गटातटाची भुमिका न घेता सर्वांना बरोबर घेवून विकासकामे करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस नगरसेवकांना बोलावले आहे. लोणंदच्या विकासकामात त्यांनी अशीच भुमिका घ्यावी. गेली 6 महिने त्यांनी समन्वयाची भुमिका घेतली आहे. लोणंदच्या मूलभुत विकासाचा पाया असणार्‍या 24 × 7 या पाणी पुरवठा योजनेसाठी धाडसी भुमिका घेतली आहे. विकासाच्या कामात कोणतेही राजकारण न आणता आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. त्यांनी लोणंदच्या विकासात बाहेरच्या मंडळींना विशेषत: आमदारांना बाहेर ठेवावे. त्यांच्या धाडसी पाऊलांना काँग्रेसचा पाठींबा राहणार आहे, असेही ते म्हणाले.

स्नेहलता शेळके-पाटील म्हणाल्या, लोणंदच्या विकासाला कोणताही अडथळा येऊ देणार नाही. त्यासाठी पुढचे पाऊल टाकणार आहे त्याला काँग्रेसने पाठींबा द्यावा. मस्कूअण्णा शेळके, बबनराव शेळके, दशरथ जाधव, आप्पासो शेळके  उपस्थित होते.