Tue, Mar 09, 2021 16:22
सातारा : मॉर्निंग वॉकवेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध पती-पत्‍नीसह सून ठार  

Last Updated: Jan 28 2021 2:05PM
लोणंद : पुढारी वृत्तसेवा 

लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ आज (गुरूवार) पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. या अपघातात पती, पत्नी, सूनेचा समावेश आहे. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अज्ञात वाहन धडक देऊन न थांबता निघून गेले आहे. मात्र अपघातग्रस्त वाहनाचा बंपर व नंबर प्लेट घटनास्थळी आढळून आली आहे. पोलिस या वाहनाचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा : खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख

या विषयी अधिक माहिती अशी की, लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळील घाडगे मळा नजीक आज (गुरूवार) पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान बबन नाना धायगुडे (वय70 वर्ष) , शांताबाई बबन धायगुडे (वय 64 वर्ष), सारिका भगवान धायगुडे (वय 34 वर्ष, सर्व रा. शेळके वस्ती) हे तिघे मॉर्निंग वॉकला निघाले होते. आपल्या घरापासून काही मीटर अंतर खंडाळा बाजुकडे चालत गेल्यानंतर पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने समोरून येऊन जोरदार धडक दिली. दुर्देवाने या अपघातात वृध्द बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे हे जागीच ठार झाले तर त्यांची सून सौ. सारीका धायगुडे या गंभीर जखमी झाल्या हाेत्‍या. त्‍यांचा उपचारा दरम्‍यान त्‍यांचाही मृत्‍यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या नागरीकांनी धाव घेतली. 

अधिक वाचा : सीमाप्रश्नी केंद्रासमोर आक्रमक व्हावे लागणार

अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन न थांबता निघून गेले असून, घटनास्थळी या वाहनाचा बंपर व नंबर प्लेट आढळून आली आहे. त्यावरून या वाहनाचा पोलिस तपास घेत आहेत. अज्ञात वाहन लोणंदच्या दिशेने निघून गेल्‍याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा : आता पाण्याच्या इंधनावर उडणार सॅटेलाईट

घटनास्थळी लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दाखल होऊन रितसर पंचनामा केला. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि संतोष चौधरी करीत आहेत.