Tue, Jun 15, 2021 12:38होमपेज › Satara › गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 10:45PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

गोवा बनावटीच्या विदेशी दारुची वाहतुक करणार्‍या दोन वाहनांसह दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दारूची 100 बॉक्स आणि 5 हजार लिटर स्पिरट तसेच आयशर व छोटा हत्ती टेम्पो असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने छापा टाकून रविवार दि. 17 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. 

जगदीश आप्पासोा केसरकर (वय 42),  मारूती भैरू माने (वय 36) दोघे रा. बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाच्या  निरीक्षकांना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक मोठ्याप्रमाणावर केली जात असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. तसेच रविवारी रात्री दारूची बॉक्स घेऊन वाहने येणार असल्याचेही समजले.

त्यानुसार भरारी पथकातील अधिकार्‍यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा व कराड येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना बरोबर घेत रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वाठार येथे एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या आयशर टेंम्पो (क्र. जीए 07 एफ 2202) व छोटा हत्ती (क्र. एम.एच.11 एजी 5501) या दोन्ही वाहनांवर छापा टाकला. यावेळी वाहनांमध्ये 5 हजार लिटर स्पिरट व गोवा बनावटीची विदेशी दारुची 100 बॉक्स आढळून आली. या कारवाईमध्ये दोघा संशयितांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही वाहनांसह सुमारे 15 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती.