Mon, Jul 13, 2020 06:39होमपेज › Satara › ‘शासकीय धान्य खासगी गोडावूनमध्ये गेलेच कसे ?’

अजित पवारांनीच त्यांना चर्चेसाठी आणावे

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 31 2017 1:28AM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

विकासकामांबाबत लोकांसमोर येऊन थेट माझ्याशी चर्चा करा, असे आव्हान मी अनेकदा विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले आहे. मात्र ते त्यांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पाटणकर पिता - पुत्रांना समोरासमोरील चर्चेसाठी तयार करावे. ही चर्चा पाटण मतदारसंघातच व्हावी, अशी आपण आता त्यांनाच विनंती करत असल्याचे सांगत आ. शंभूराज देसाई यांनी आ. अजित पवार यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. 

हिवाळी अधिवेशनात पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा झाली. तसेच डोंगरी भागातील पाणी पुरवठा योजना, पवनचक्कीमुळे खराब झालेले 10 रस्ते तसेच महिंद धरणाच्या सांडव्याची गळती याबाबत राज्य शासनाने 32 कोटीहून अधिक निधी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. देसाई बोलत होते.

आ. अजित पवार हे विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांना चुकीची माहिती दिली गेल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली. वास्तविक आपण विकासकामांबाबत लोकांसमोर एकाच व्यासपीठावर चर्चा करण्याचे आव्हान यापूर्वी पाटणकर पिता - पुत्रांना दिले होते. त्यामुळे आता अजित पवार यांनीच पाटण मतदारसंघात यावे आणि त्यांच्या उपस्थितीतच आपण पाटणकर पिता - पुत्रांशी विकासकामांबाबत चर्चा करायला तयार आहे. अजित पवार हे आपले चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देत नाही. मी त्यांना केवळ विनंती करतो आहे, हेही सर्वांनी लक्षात घ्यावे, असे सांगण्यासही आ. देसाई यावेळी विसरले नाहीत.

दरम्यान, डोंगरी भागात वसलेल्या ज्या गावातील नळपाणी योजनांचा राष्ट्रीय पेयजलमध्ये समावेश होता, त्या 32 गावच्या योजनांनाही लवकरच सुरूवात होणार आहे. याबाबत उच्चस्तरीय बैठक झाल्याचेही आ. देसाई यांनी सांगितले. तसेच महिंद धरणाच्या सांडव्याला असलेली गळती काढण्यासाठी 76.41 लक्ष रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे. या दोन कामांसह पवनचक्कीमुळे जे रस्ते खराब झाले आहेत, त्यापैकी 10 रस्त्यांना 18 कोटी 69 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही आ. शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

शासकीय धान्य खासगी गोडावूनमध्ये गेलेच कसे ? ...

वाईतील धान्य घोटाळ्याबाबत आपण अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नावर 27 मिनिटे चर्चा झाली. शासकीय धान्य खाजगी गोदामात गेलेच कसे? पुरवठा विभागाची काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्‍न उपस्थित करत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आपण केली. आता याप्रकरणी उपायुक्त चौकशी करणार आहेत, असे आ. देसाई यांनी सांगितले.