Wed, Jul 08, 2020 04:42होमपेज › Satara › कोल्हेकुई उठवणार्‍यांना चपराक : खा. उदयनराजे 

कोल्हेकुई उठवणार्‍यांना चपराक : खा. उदयनराजे 

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 12 2019 11:38PM
सातारा : प्रतिनिधी

ज्या जागेवर सातारा नगरपरिषदेची सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करावयाची आहे ती जागा नगरपरिषदेने नाममात्र एक रुपया देवून खुषखरेदी केलेली आहे. या जागेवरील टाऊन हॉलच्या आरक्षणाऐवजी नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत असा आरक्षण बदल करण्याच्या नगरपरिषदेने घेतलेल्या  धोरणात्मक निर्णयास, राज्य शासनाने नुकतीच  मान्यता  दिली असून धोरणात्मक निर्णयाच्या वेळी श्रेयवादाकरता  ज्यांनी आरक्षणात बदल होणार नाही, असे कसे होईल? अशी कोल्हेकुई उठवली होती,  त्यांना ही फार मोठी चपराक  असल्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  लवकरच  नगरपरिषदेची सुसज्ज,  अशी प्रशासकीय इमारत सदरबझार येथे नियोजित जागेत उभी केली जाईल. नगरपरिषदेची ही प्रशासकीय इमारत झाली तर, खा. उदयनराजेंना श्रेय जाईल, अशी भिती ज्यांना वाटते, अशा संकुचित विचारी व्यक्‍तींनी नगरपरिषदेने  प्रशासकीय इमारतीबाबत घेतलेल्या धोरणात्मक  निर्णयाच्यावेळी आकांडतांडव करताना,  असे होवू शकत नाही, आरक्षण वगळले जाणार नाही, एक रुपयांत जागा कशी घेतली, असं कुठ असतं का? असे रडीचे प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यांचा विरोधाचा हेतू शुध्द नव्हता. प्रशासकीय इमारत झाली तर खासदारांना श्रेय जाईल, मग आपलं कसं होईल? अशी अनामिक परंतु रास्त भिती त्यांच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्यांची कोल्हेकुई सुरु होती. तथापि आपण कधीही श्रेयासाठी कामे केली नाहीत, असे खा. उदयनराजे यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे. 

आज प्रशासकीय  इमारतीच्या  टाऊन हॉलचे आरक्षण वगळण्यात आले असून त्याऐवजी नगरपरिषद प्रशासकीय  इमारत, असा आरक्षण बदल करण्यास मान्यता राज्य शासनाने दिली आहे. प्रशासकीय इमारतीला विरोध करणार्‍यांना ही जबरदस्त चपराक बसल्याचे खा. उदयनराजे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

1977 पासूनचे रखडलेले कास बंदिस्त पाईपलाईनचे काम आपण  सुरु करुन, पूर्णत्वास नेले. परंतु, ते म्हणतात आम्हीच केले.  कासचे श्रेय आमचेच आहे.  कास धरणाची उंची वाढवण्याचे काम आम्ही  मार्गी लावले. परंतु त्यांनी मात्र, तत्कालीन वित्‍त मंत्री यांनी निधीची तरतूद केली म्हणून श्रेय त्यांचे आहे, अशी श्रेयवादाची खोटी आवई उठवली. ग्रेड सेपरेटरची संकल्पना आम्ही मांडली, त्यावेळी त्यांची चेष्टेचा विषय केला, आज ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून आता हेच लोक ग्रेडसेपरेटरचा निधी सरकारने दिला, अशी श्रेयवादाची कोल्हेकुई करत  आहेत. भुयारी गटर योजनेबाबत त्यांची हिच श्रेयवादाची आडमुठी भुमिका होती. याउलट आम्ही प्रस्तावित व पाठपुरावा केलेल्या विविध कामांचे श्रेय आम्ही सर्वसामान्य जनतेलाच देतो, असे खा. उदयनराजे यांनी या पत्रकात म्हटले आहे.