होमपेज › Satara › विधानसभेनंतर कारखान्याची जुळवाजुळव

विधानसभेनंतर कारखान्याची जुळवाजुळव

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
कराड : प्रतिनिधी

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार्‍या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत दुरंगी सामना होणार की तिरंगी ? याबाबत आत्तापासूनच उत्सुकता आहे. सत्ताधारी भोसले गटाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आत्तापासून व्यूहरचना सुरू झाली असून विधानसभेनंतर ‘आता लक्ष्य कारखाना’ अशी बॅनरबाजी काही गावात पहावयास मिळत आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची सभासद संख्या सुमारे 40 हजाराहून अधिक आहे. त्यातच 13 हजार वादग्रस्त सभासद, अक्रियाशील सभासद, मोफत साखर वाटप, सभासदांना दिला जाणारा दर यासारखे कोणते ना कोणते मुद्दे 1989 पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत सातत्याने चर्चेत असतात. 2010 साली तत्कालीन चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. अतुल भोसले गटात मनोमिलन होते. या निवडणुकीत सर्वांना धक्का देत अविनाश मोहिते गटाने ऐतिहासिक सत्तांतर घडवले होते. पुढे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना साथ करत डॉ. अतुल भोसले यांना विरोध केला होता. त्यामुळे मोहिते - भोसले मनोमिलन संपुष्टात आले होते.

पुढे 2015 साली सर्वांचे अंदाज चुकवत डॉ. अतुल भोसले आणि विलासराव पाटील - उंडाळकर गट एकत्र आले होते. कृष्णा कारखाना निवडणुकीत उंडाळकर गटाने अविनाश मोहिते गटाच्या विरोधी भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अविनाश मोहिते गटाला साथ केली होती. तर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे काही समर्थक अविनाश मोहिते, काही समर्थक डॉ. अतुल भोसले आणि समर्थक डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांच्यासमवेत होते. या चुरशीच्या तिरंगी लढतीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटींग झाल्याने प्रथमच विरोधी गटाचे 6 संचालकही विजयी झाले होते. या निवडणुकीत मोहिते गट, भोसले गट आणि तत्कालीन सत्ताधारी अविनाश मोहिते गट यांच्यात तिरंगी लढत झाली होती. 2017 साली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी मदनराव मोहिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी डॉ. अतुल भोसले यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आजही ते खंबीरपणे डॉ. अतुल भोसले यांच्या पाठिशी उभे आहेत. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना साथ देत डॉ. अतुल भोसले यांच्या पराजयातही मोलाची भूमिका बजावली आहे.

कारखाना निवडणुकीत वाळवा, कडेगाव तालुक्यातील सभासद नेहमीच निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत कदम यांची भूमिका निर्णायक ठरते. आमदार कदम हे इंद्रजित मोहिते यांच्याच बाजूने असणार आहेत. तर अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे नेते असल्याने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे त्यांनाच साथ देतील असा अविनाश मोहिते समर्थकांचा दावा आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते या दोघांनीही साथ केली आहे. त्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते गटात समेट घडवण्यात यशस्वी होणार का ? विलासराव पाटील - उंडाळकर गटही डॉ. अतुल भोसले गटाविरोधीच भूमिका घेण्याची शक्यता अधिक असल्याचे सध्यस्थितीवरून दिसून येते. मात्र राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे मागील दशकभरात दिसून आले आहे. त्यामुळेच सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आत्तापासून कारखाना निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी काँगे्रस - राष्ट्रवादीची भूमिका काय असणार ? कारखाना निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांसह सभासदांच्या मनात निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.