Sun, Aug 09, 2020 02:50होमपेज › Satara › कराडच्या ‘डीबी’ला लागले पुन्हा कुलूप !

कराडच्या ‘डीबी’ला लागले पुन्हा कुलूप !

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:39PM

बुकमार्क करा

कराड : अमोल चव्हाण

कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) अधिकार्‍यांसह पोलिसांवर कारवाई झाल्याने ही शाखा पुन्हा चर्चेत आली आहे. या शाखेला गेल्या अनेक दिवसांपासून लागलेले निलंबनाचे ग्रहण कायम असून या कारवाईमुळे शाखेला पुन्हा कुलूप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारी घटनांसह गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

चोर्‍या, मारामारी, गुंडगिरी, दरोडा, खासगी सावकारी यासह एकूणच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे काम डीबीचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. वाढत्या गुन्हेगारी घटनांवर या शाखेने चांगलेचा जरब बसविला होता. तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास धस यांच्या कालावधीत या शाखेने कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळत धुमस्टाईल चोर्‍यांनाही गजाआड केले होते. मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला धस यांनी गोळ्या घातल्या होत्या.

त्यानंतर हनुमंत कांकडकी यांनीही गुन्हेगारी घटनांना आळा घातला होता.सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सुमारे सहा महिन्यापुर्वी ‘डीबी’चा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनीही गुन्हेगारांवर वचक निर्माण करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. गत सहा महिन्यात हनुमंत गायकवाड यांच्या टिमने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सात चोर्‍यांमधील 32 तोळे सोने हस्तगत केले होते.

घरफोडी, धुमस्टाईल चोर्‍यांसह पोलीस असल्याची बतावणी करून लुटणार्‍यांचे एकूण 30 गुन्हे उघडकीस आणले. दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून 13 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. जुन 2017 पासून आत्तापर्यंत 74 लाख 21 हजार 332 रूपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल त्यांच्या पथकाने हस्तगत केला. वारूंजी येथील सतनाम एजन्सीतील 32 लाखांच्या चोरीचा छडाही डीबीच्याच पथकानेच लावला आहे. परंतु, त्यांची ही कामगिरी सध्या झाकोळल्याचे दिसून येत आहे.