Sat, Apr 10, 2021 20:17
सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी; ५१४ पॉझिटिव्ह

Last Updated: Apr 07 2021 1:48AM

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून दिवसेंदिवस पॉझिटिव्हिटीचा टक्का वाढत आहे. गत काही दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. त्यातच सातारा तालुका हॉटस्पॉट बनू लागला आहे. मंगळवारी 514 बाधित आढळले असून तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 208 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे व मुंबईशी संपर्क असलेला जिल्हा असल्याने पुणे व मुंबई पाठोपाठ सातार्‍यातही बाधित रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच 3 हजार 230 बाधित रूग्ण आढळले असून तब्बल 21 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांसह कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासोबतच कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठीची उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. 

शून्यावरून पुन्हा दोन ते चार मृत्यू होण्यापर्यंतचा आकडा आता सातवर जाऊन पोहचला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात बेड कमी पडू नयेत यासाठी कोरोना केअर सेंटर ही सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 329 उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण करण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने केली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी 514 बाधित आढळले असून त्यात सातारा तालुक्यात 142, कराड 83, फलटण 55, पाटण 12, खटाव 26, माण 15, कोरेगाव 40, खंडाळा 8, वाई 51, महाबळेश्वर 40, जावली 3 व इतर 25 असे बाधित आढळले आहेत. तर सातार्‍यातील सदरबझार येथील 82 वर्षीय वृद्धा, कोडोली येथील 72 वर्षीय वृद्ध, सातारा येथील 74 वर्षीय वृद्ध, नित्रळ येथील 72 वर्षीय वृद्ध, कोरेगाव तालुक्यातील विखळे येथील 67 वर्षीय वृद्ध, वाई तालुक्यातील भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील ललगुण येथील 55 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा शहर शतकाच्या उंबरठ्यावर

बाधितांचा आकडा 70 हजारांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळणार्‍या रुग्णांमध्ये 25 टक्के बाधित सातारा तालुक्यात आढळू लागले आहेत. त्यात सातारा शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. मंगळवारी तालुक्यातील आढळलेल्या 142 रुग्णांमधील तब्बल 93 रुग्ण शहरात आढळले आहे. सातारा शहरच बाधितांसंदर्भात शतकाच्या उंबरठ्यावर आल्याने धोक्याची घंटा मानली जात आहे.