Sun, Aug 09, 2020 01:31होमपेज › Satara › कोल्हापूर, रत्नागिरीचे एकतर्फी विजय

कोल्हापूर, रत्नागिरीचे एकतर्फी विजय

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:11PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

येथील शिवाजी स्टेडियमवर सुरू झालेल्या 65 व्या राज्य निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत उद्घाटनाच्या सामन्यात कोल्हापूरने औरंगाबादवर 38 गुणांनी दणदणीत विजय मिळवला.  त्याचबरोबर रत्नागिरीनेही 23 गुणांनी बीड संघावर मात केली.  तर महिलांच्या गटात सातारा संघाने सोलापूर संघावर पाच गुणांनी विजय मिळवला.

आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. कोल्हापूरच्या पुरुष संघात तुषार पाटील, आनंदा पाटील या प्रो-कबड्डीतील खेळाडूंचा सहभाग होता. तसेच पोलिस दलातील विवेक भोईटे यांचाही समावेश असल्याने हा संघ मजबूत होता. अपेक्षेप्रमाणे तुषार पाटील, आनंदा पाटील यांनी प्रथमपासून वर्चस्व राखल्याने मध्यंतरापर्यंतच कोल्हापूरने मोठा विजय निश्‍चित केला होता. जवळपास 22 गुणांची आघाडी घेत कोल्हापूरने औरंगाबादला केवळ 4 गुणांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. मध्यंतरानंतरही हेच वर्चस्व कायम राखत कोल्हापूरने 53 विरुद्ध 15 गुणांनी मोठा विजय मिळवला.

तर दुसरीकडे महिला गटात सातारा आणि सोलापूर या महिलांच्या सामन्यात सुरवातीपासूनच चुरस पहावयास मिळाली. मध्यंतरापर्यंत सातारा संघाने 20 गुण मिळवले होते. सोलापूर संघाने  11 गुण मिळवले होते. मध्यंतरानंतर मात्र सोलापूरने जोरदार प्रतिकार करत सातार्‍यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातारा संघाने तोडीस तोड खेळ केल्याने अखेर पाच गुणांनी सोलापूरला पराभवाचे तोंड पहावे लागले. मध्यंतरानंतर सोलापूरने 20 गुण तर सातारने 16 गुण मिळवले. मात्र पहिल्या सत्रातील आघाडी सोलापूरला महागात पडली. 

याशिवाय पुरुष गटात रत्नागिरी आणि बीड यांच्यात सामना झाला. हा सामनाही कोल्हापूरप्रमाणे रत्नागिरीने एकतर्फी वर्चस्व राखत जिंकला. रत्नागिरीस 53 तर बीडला 28 गुण मिळाले. पहिल्या सत्रात मात्र रत्नागिरी आणि बीड यांच्यात चुरशीचा खेळ झाला. रत्नागिरीने 27 तर बीडने 20 गुण मिळविल्याने या सामन्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र मध्यंतरानंतर रत्नागिरीने तब्बल 26 गुण मिळवून बीडला जोरदार झटका दिला.  बीडला मध्यंतरानंतर केवळ 8 गुण मिळवता आल्याने त्यांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.