Sun, Jul 12, 2020 18:55होमपेज › Satara › एका शेळीने दिला ५ कोकरांना जन्म

एका शेळीने दिला ५ कोकरांना जन्म

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 7:35PM

बुकमार्क करा
मसूर : दिलीप माने

सह्याद्रि सह.साखर कारखान्यापासून 1 कि.मी. अंतरावर असलेल्या कराड तालुक्यातील शहापूर येथे एका धनगराच्या कळपातील शेळीने चक्‍क 5 कोकरांना जन्म दिल्याने ही घटना आश्‍चर्यकारक असल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहापूर ता.कराड येथील तानाजी धोंडीराम फसाले यांचा वडिलोपार्जित शेळीपालनाचा व्यवसाय आहे. सध्या त्यांच्याकडे 25 शेळयांचा कळप आहे. या कळपातील एका उस्मानाबादी जातीच्या गावठी  शेळीने 4 दिवसापूर्वी 2 बोकड व 3 पाटांना जन्म दिला. ही विशेष बातमी वार्‍यासारखी तालुक्यात पसरली आणि शेळीसह तिच्या पिलांना पहायला बघ्यांनी एकच गर्दी केली.  
याबाबत बोलताना तानाजी फसाले म्हणाले, आजवर एखाद्या शेळीने 2,3 कोकरांना जन्म दिलेल्या आमच्या वाडवडील व आजोबा-पंजोबापासूनच्या घटना आहेत. एखादवेळी 4 कोकरे झाल्याचा अंदाज ऐकिवात होता. पण यावेळी आश्‍चर्यच घडले. आमच्या उस्मानाबादी जातीच्या शेळीने चक्‍क 5 त्याही सदृढ कोकरांना  जन्म दिला. आता या पिलांचे व तिच्या आईचे चांगले संगोपन करून या जातीचे वाण आपण जोपासणार असल्याचे सांगून या व्यवसायात मला वडील धोंडीराम फसाले, आई इंदूबाई व पत्नी कोमल यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. 

निरक्षर तानाजीच्या कुटुंबाचा आदर्श...

परंपरेने चालत आलेला व्यवसाय सांभाळताना तानाजीला शिक्षणाची गोडी लागलीच नाही. त्यामुळे तो निरक्षरच राहिला. त्यामुळे पत्नीही निरक्षर मिळाली. लग्‍नानंतर   दोन्हीही मुलीच म्हणून कपाळावर हात न मारता या मुलीच आपला वंशाचा दिवा म्हणून दोघांनी कुठलाही विचार न करता कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यास घरच्यांनीही संमती दिली. दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देणार असल्याचे तानाजी फसाले म्हणाले. 

या घटनेकडे गांभीर्याने पहावे..

शासनाने या घटनेकडे अनपेक्षित व आश्‍चर्यकारक म्हणून न  पाहता या जातीचे संगोपन करून वाण वाढविल्यास आणि ते शेतक-यांना पुरविल्यास शेतकरी बांधव या दुय्यम व्यवसायातून चांगली प्रगती साधू शकेल असे मत भाजपा किसान मोर्चा कराड उ. तालुकाध्यक्ष संदीप बाबर यांच्यासह जाणकारांनी व्यक्‍त केले.