Fri, Sep 25, 2020 16:35होमपेज › Satara › 400 गावठी बॉम्बसद़ृश गोळे जप्त 

400 गावठी बॉम्बसद़ृश गोळे जप्त 

Last Updated: Dec 14 2019 10:40PM
उंब्रज : प्रतिनिधी

तारळे (ता. पाटण) हद्दीतील तारळे-कोंजवडे मार्गावर संशयितरीत्या फिरणार्‍या एका परप्रांतीय युवकास उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चारशे गावठी बॉम्बसदृष गोळे, 7 मोबाईल व 20 हजार 500 रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.  ही कारवाई शुक्रवारी (दि. 13) करण्यात आली. दरम्यान, कमी किमतीत सोने देतो, असे आमिष दाखवून युवकांची फसवणूक करणार्‍या टोळीतील हा संशयित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

अमर लुंगा आदीवासी मक्कड (वय 40) रा.कोड ता. जि. कटनी  मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे. उंब्रज पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अजय गोरड यांना तारळे परिसरात परराज्यातील फिरस्ते फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस पथकासह त्यांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तारळे परिसरात शोध मोहीम राबवली. त्यावेळी तारळेकडून एक युवक संशयितरित्या येत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चारशे गावठी बॉम्ब सदृश्य गोळे,  सात मोबाईल आणि वीस हजार पाचशे रुपयांची रक्कम हस्तगत केली. 

सदरची कारवाई स.पो.नि.अजय गोरड, पो.ह.कृष्णा जाधव, लक्षण जगधने, दत्तात्रय लवटे, पृथ्वी जाधव, अजय शेडगे, अमोल देशमुख, सचिन देशमुख, सूर्यकांत कुंभार, सचिन ससाणे, महिला पोलिस सीमा करपे आदींनी केली.

दरम्यान गुरुवार दि.13 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास शिरगाव ता.कराड गावचे हद्दीत अंबवडे ता.कोरेगांव येथील विवेक अशोक येवले व त्याच्या मित्रांना  परप्रांतीयांच्या टोळीने सोन्याऐवजी धातूचे तुकडे देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शिवाय त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून पाच लाख रुपयांची रोकड लुटून त्यांनी पोबारा होता. याप्रकरणी विवेक अशोक येवले यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची  चक्रे हलवित परप्रांतीय टोळीतील एका संशयितास अटक केली आहे.

 "