होमपेज › Satara › जिल्ह्यात २४ तासांत ४० पॉझिटिव्ह; ४ बळी

जिल्ह्यात २४ तासांत ४० पॉझिटिव्ह; ४ बळी

Last Updated: Jun 01 2020 11:02PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-पुण्यासह परराज्यातून आलेल्या नागरिकांमुळे गेले काही दिवस कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. पॉझिटिव्हचा आकडा झपाट्याने वाढू लागला असून बळीही जाऊ लागलेत. सोमवारी दिवसभरात 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जावली तालुक्यातील रांजणी येथील 85 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर इतर तीन संशयितांचा मृत्यू झाला. यामुळे आता जिल्ह्यात बळींची संख्या 22 झाली असून बाधितांचा आकडा 556 वर गेला आहे.

पूर्वीच्या 237 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आणखी 233 नवे संशयित दाखल झाले. तर कृष्णा हॉस्पिटलसह विविध ठिकाणचे 40 जण कोरोनामुक्त झाले असून मृत पश्चात तपासणीला पाठवलेले 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी बाधितांसह मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. 

सोमवारी जावली तालुक्यातील रांजणी येथील 85 वर्षीय महिलेचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याचबरोबर मुंबई रिटर्न व होम क्वारंटाईन असलेली वाई तालुक्यातील भोगाव येथील 85 वर्षीय महिला, गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला, कॅन्सरग्रस्त आणि दोन दिवसापूर्वी मुंबईवरून आलेला 52 वर्षीय पुरुष या तीन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. या तीन जणांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आहेत. 

दिवभरात पाटण तालुक्यातील नवरसेवाडी येथील तीन, काळेवाडी येथे एक, वाई तालुक्यातील ओव्हाळी व जांभळी येथील प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील रहिवासी असलेली ग्रामीण रुग्णालयातील महिला आरोग्य सेविका, महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशीत एक व हरचंदी येथे 2, गोरोशी येथे एक, फलटण तालुक्यातील बरड 1, वडाळे येथील 1, जावली तालुक्यातील कावडी, कळकोशी व केळघर (सोळशी) येथील प्रत्येकी एक, कराड तालुक्यातील विंग येथे 2, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे 1 व खटाव तालुक्यातील अंभेरी येथील तीन यांच्यासह रात्री उशिरा 18 जणांच रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात एकूण 40 जण बाधित झाले आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील 57 वर्षीय पुरुष, पाथरवाडी ता. कराड येथील 33 वर्षीय पुरुष व सातार्‍यातील बुधवार पेठ येथील 65 वर्षीय महिला, अंबेदरे आसरे ता. वाई येथील 43 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष असे 5 जणांचा मृत्यू पश्चात घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.  विविध हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असणारे 40 जणांचे 14 व 15 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य यंत्रणेने पुष्पगुछ देऊन टाळ्यांच्या गजरात आनंदमय वातावरणात त्यांना निरोप दिला. 

सोमवारी एकदम 40 जण बाधित झाल्याने जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 556 झाला असून आतापर्यंत 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 334 बाधितांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. नव्या 233 संशयितांच्या घशातील स्रावाचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.