Tue, Jul 07, 2020 04:33होमपेज › Satara › कराड : मलकापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्वच्छतेच्या स्तरावर 3 स्टार मानांकन

कराड : मलकापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्वच्छतेच्या स्तरावर 3 स्टार मानांकन

Last Updated: May 25 2020 3:48PM
कराड : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन 2019-20 करिता केंद्र शासनाने कचरामुक्त तारांकित मानांकन शहर ही नवीन संकल्पना राबविली आहे. यामध्ये मलकापूर शहरास स्वच्छतेच्या स्तरावर 3 स्टार मानांकन देण्यात आले आहे. शहरी व नागरी कार्य मंत्रालयाद्वारे दि. 19 मे रोजी याबाबतचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. हे मानांकन मिळाल्याने मलकापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

मलकापूर नगरपरिषदेने लोकसहभागातून विविध नाविण्यपुर्ण योजना राबवून देशपातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, त्यामध्ये 24 बाय 7 नळ पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, सोलर सिटी प्रकल्प, सांडपाणी प्रकिया योजना, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान आदी योजनांचा समावेश आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान पुरस्कार व नॅशनल अर्बन वॉटर पुरस्कार मिळाला आहे. मलकापूर पाणीपुरवठा योजना गेली 10 वर्षे यशस्वीपणे सुरु आहे.

घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत दैनंदिन कचरा संकलन, घरामध्येच ओला, सुका व घरगुती घातक कचर्‍याचे वर्गीकरण, कचर्‍यावर प्रक्रिया, बांधकामाच्या वेस्ट मटेरियलचे संकलन इत्यादी कामांची कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी त्रयस्थ संस्थेमार्फत डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली. तपासणीनुसार केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या निकालाप्रमाणे मलकापूर शहरास 3 स्टार मानांकन प्राप्त  झाले आहे. मलकापूर शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक यांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभल्यानेच हे यश मिळाले आहे. नगराध्यक्षा सौ. निलम धनंजय येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे.

मलकापूरला 3 स्टार मानांकन प्राप्त झालेबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले. यासाठी नगरविकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे सहाय्यक संचालक सुधाकर बोबडे, प्रशांत खांडकेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी रवि पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.

मलकापूर शहराला मिळाली नवी ओळख...

कचरामुक्त तारांकित मानांकन स्पर्धेसाठी देशपातळीवर एकूण 4 हजार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी देशपातळीवर एकूण 64, महाराष्ट्रात 396 पैकी एकूण 34 व सातारा जिल्हयात 16 पैकी एकूण 4 स्थानिक स्वराज्य संस्थांना 3 स्टार मानांकन प्राप्त झालेले आहे. यामध्ये मलकापूर शहरासह कराड, महाबळेश्वर, पाचगणीचा समावेश आहे. या मुल्यांकनामुळे  मलकापूर शहरास स्वच्छ सर्वेक्षण 2020 करिता 500 गुण प्राप्त झाले असून, 3 स्टार मलकापूर म्हणून शहराला एक नवीन ओळख मिळाली आहे.

केंद्र शासनामार्फत मलकापूर शहरास ओडीएफ, ओडीएफ+, ओडीएफ++ व आता कचरामुक्त शहराचे 3 स्टार मानांकन मिळाल्याने शहराच्या शिरपेचात खोवलेला मानाचा आणखी एक तुरा आहे. सन 2020-21 करीता कचरामुक्त शहर तारांकित मानांकन स्पर्धेमध्ये नागरिकांच्या सहभागातून मलकापूर शहरास 5 स्टार शहर मानांकन मिळविण्याचा मनोदय आहे.

-मनोहर शिंदे,  उपनगराध्यक्ष, मलकापूर