Fri, Sep 25, 2020 12:15होमपेज › Satara › १७ नं. फॉर्मनुसार यावर्षी शेवटचीच परीक्षा

१७ नं. फॉर्मनुसार यावर्षी शेवटचीच परीक्षा

Published On: Jun 02 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 10:57PMऔंध :वार्ताहर

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 नं. चे हे शेवटचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून फॉर्म  17 नं. भरून दहावी-बारावीच्या परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा मुक्त विद्यालय मंडळ घेणार असल्याचे संकेत आहेत. या दिशेने मुक्त विद्यालय मंडळाची रचना तयार करण्याचे कार्य अभ्यास गटाकडून केले जात आहे. 

दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म क्रमांक सतरा भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणार्‍या  विद्यार्थ्यांचा समावेश असतो, मात्र ही मुभा शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बंद करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत मूलभूत विषयांबरोबरच आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना राज्यात लवकरच सुरू होणार्‍या  मुक्त विद्यालय मंडळातर्फे  परीक्षा देता येणार आहे. 

या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील  सतरा  क्रमांकाच्या फॉर्मसाठीच्या केंद्रातून मार्गदर्शन मिळत असते. मुक्त विद्यालय मंडळाकडून परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास फॉर्म सतरा भरून परीक्षा देण्यासाठी दोन हजार अठरा एकोणीस हे शेवटचे वर्ष ठरणार आहे.  

दहावीचा अभ्यासक्रम नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच अतिप्रगत  विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते मुख्य शिक्षण प्रवाहातही राहावेत, यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुक्त विद्यालय मंडळ हा राज्य शिक्षण मंडळाचा भाग असेल. त्याद्वारे दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण सुरू होणार आहे.