Sat, Jul 11, 2020 11:23होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यातून १७ गुंड तडीपार

सातारा जिल्ह्यातून १७ गुंड तडीपार

Last Updated: Jul 01 2020 8:06AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी गुन्हेगारी वाढू पाहत आहे, त्या ठिकाणच्या गुंडांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तडिपारीचा दणका देत गुन्हेगारी क्षेत्राचे कंबरडे मोडले. मंगळवारी पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 17 गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश त्यांनी काढले. एकाचवेळी एवढेजण ‘कामाला’ लागल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल रमेश गुजर (वय 27, रा. गोळीबार मैदान), शंभो जगन्नाथ भोसले (21, भोसले कॉलनी, कोडोली) यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेे. सरकारी कामात अडथळा आणून सरकारी नोकरास मारहाण करणे, वाहन चोरी असे या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अनिल सुरेेश थांडे (वय 21, रा. मोळाचा ओढा), शुभम ऊर्फ सोन्या संभाजी जाधव (24, रा. सैदापूर) यांना 1 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. संशयितांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारामारी असे या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दीपक शामराव वारागडे (वय 45, रा. कुडाळ), सुनील गोविंद गावडे (32, रा. कुडाळ), प्रवीण रामचंद्र वारागडे (44, रा. कुडाळ) यांना जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. संशयितांवर जुगार, बेकायदा दारू विक्री असे गुन्हे दाखल आहेत. उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश ऊर्फ भैया बापू जाधव (25), अक्षय बापू जाधव (वय 21), समीर सुधीर दुधाणे (वय 24), प्रकाश जयसिंग जाधव (वय 30), रुपेश रविंद्र घाडगे (वय 20), संतोष सुभाष कांबळे (वय 20, सर्व रा.उंब्रज ता.कराड) या टोळीला 1 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहेे. या संशतियांवर खंडणी, गर्दी, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिपक नामदेव मसुगडे (वय 22), नामदेव बबन मसुगडे (वय 22), नवनाथ अशोक जाधव (वय 20), दत्तात्रय दादासो मसुगडे (सर्व रा. रणसिंगवाडी ता.खटाव) यांना 1 वर्षासाठी माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. संशयितांवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

संशयित सर्वांचे त्या पोलिस ठाण्यातून तडीपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. संशयित सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. संशयितांची दहशत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर संशयितांची सुनावणी पोलिस अधीक्षकांसमोर झाल्यानंतर त्यांना तडीपार करण्यात आले. एकाचवेळी 17 जण तडीपार झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.