Sat, Jul 04, 2020 00:22होमपेज › Satara › सातार्‍यात मतमोजणीसाठी 15 पथके

सातार्‍यात मतमोजणीसाठी 15 पथके

Published On: May 18 2019 1:44AM | Last Updated: May 18 2019 1:44AM
सातारा ः प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नवीन एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये होणार्‍या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक शाखेकडून मतमोजणीसाठी वेगवेगळी 15 पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांना कामकाज ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार पथकांनी दिलेल्या कामांची कार्यवाही सुरू केली आहे. 

सातारा लोकसभा निवडणूक मतमोजणीवेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर ‘ईटीपीबीएस’ मतमोजणी 34  तर  टपाली मतमोजणी 6 टेबलांवर होणार आहे. मतमोजणीदरम्यान फेरीनिहाय निकाल पांढर्‍या व काळ्या फलकावर दर्शवण्यात येणार आहे. अंतिम निकाल तयार करणे, आयोगाकडे विविध अहवाल वेळेत सादर करणे, मतमोजणीअंती ईव्हीएम मशीन व संविधानिक कागदपत्रे सील करणे इत्यादी सर्व कामे बिनचूकपणे पार पाडण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 

मोजणी पर्यवेक्षक व सहायक नेमणूक व प्रशिक्षण पथकाकडून  पर्यवेक्षक व सहाय्यकांची नियुक्ती करणे तसेच निवडणूक कामातील  संबंधित अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना ओळखपत्रे देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी व स्टाफला ओळखपत्र देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पासेस तयार करुन देणे तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना पास देण्याची जबाबदारी या पथकाकडे देण्यात आली आहे. सुरक्षा कक्षाच्या प्रवेशद्वारावर दंडाधिकारी म्हणून कामकाज पाहणे व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठीही पथक स्थापन केले आहे.

ईव्हीएम सुरक्षा कक्षातून संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी ठिकाणी नेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. हे पथक विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत सुरक्षा कक्षातून ईव्हीएम मशीन फेरीनिहाय विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी देणे व मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीन, आवश्यक कागदपत्रे सील करणे,  जिल्हा कोषागारामध्ये ठेवण्याची जबाबदारी या पथकावर आहे. भोजन व्यवस्थेसाठीही पथक करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांना चहा, अल्पोपहार, पाणी व जेवणाची सोय हे पथक करणार आहे.

मतमोजणीसाठी आवश्यक स्टेशनरी व साहित्य पुरवण्यासाठी पथक स्थापन केले आहे. हे पथक मतमोजणी टेबलावरील टपाली मतमोजणी, व्हीव्हीपॅट मतमोजणी, प्रशिक्षण सिलींग इत्यादी कामकाजासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणार आहे.  व्हीव्हीपॅट पेपर स्लीप मतमोजणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. मतमोजणी अहवाल संकलन व प्रमाणपत्र देवून आयोगास अहवाल पाठवण्यासाठी पथक नेमले आहे. तांत्रिक सहाय पथक मतमोजणी कक्ष व परिसरात नेट सुविधा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतमोजणीवेळी संगणक संबंधी तांत्रिक बाबींसाठी सहाय्य करणार आहे. 

ईटीपीबीएस व पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी पथक नेमले आहे. एकत्रिकरण पथक, लेखा पथक, समन्वय कक्ष अशी पंधरा पथक स्थापन करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया गतीमान होवून लवकर काम आटोपता यावे यासाठी ही पथके महत्वाची ठरणार आहेत. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सर्व पथकांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेवून त्यांना आपापल्या कामांचे नियोजन कशा पध्दतीने करायचे आहे, याबाबत सुचना केल्या. त्याप्रमाणे पथकातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामे करावीत, अशा सुचना केल्या आहेत. मतमोजणी अनुषंगाने संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.

मीडिया सेलची उभारणी

मीडिया सेंटरमध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी तयार करण्यात आलेल्या मीडिया सेलचे आयोगाच्या निर्देशानुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन कामकाज पाहण्यासाठी पथक नेमले आहे. लोकांसाठी जनसंवाद कक्ष उभारण्यात येणार आहे. मतमोजणी ठिकाणच्या प्रवेशद्वारावर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी जमा करून सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधितांना टोकन देऊन मोबईल ताब्यात घेणे व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टोकननुसार मोबाईल संबंधितांना परत करण्याची जबाबदारी या पथकावर सोपण्यात आली आहे.