Sat, Jul 04, 2020 04:04होमपेज › Satara › कराडात रस्त्यांसाठीचे ११ कोटी खड्ड्यात! 

कराडात रस्त्यांसाठीचे ११ कोटी खड्ड्यात! 

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 8:49PMकराड : प्रतिभा राजे 

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर आणला होता. त्यातून शहरामध्ये झालेल्या अनेक निकृष्ठ कामाचे नमुने नागरिकांसमोर येत असतानाच गेल्या सहा महिन्यातच केलेल्या शहरातील मुख्य रस्त्याच्या चिंध्या झाल्या आहेत. कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या या दरम्यान 11 कोटी रूपयांच्या खर्चातून करण्यात आलेला रस्ता म्हणजे निकृष्ठ कामाचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे निधी नगरपालिकेने वापरला की संपवला अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. 

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामध्ये विविध विकासकामांबरोबरच कराडच्या मुख्य रस्त्यासाठी 11 कोटी रूपयांचा निधी  देण्यात आला होता. या निधीतून तयार करण्यात आलेला हा रस्ता वर्षभरातच खचला आहे, रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. जुन्या रस्त्यावरच मुलामा दिल्याने वरच्या मुलाम्याचा थर निघून रस्त्यावर ठिगळ लावल्यासारखी रस्त्याची अवस्था झाली आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या मुख्य रस्त्यासाठी हा निधी मंजूर झाला. मार्च 2016 मध्ये कामाचा आदेश निघालेल्या व प्रत्यक्षात वर्षभरानंतर सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामाला एक वर्षाची मुदत देण्यात आली.

मात्र अद्यापही हे काम सुरूच आहे. या निधीअंतर्गत करावयाच्या कामामध्ये रस्त्यासह आरसीसी गटर्स, दुभाजकाचा समावेश आहे. कोल्हापूर नाक्यापासूनच रस्ता जागोजागी खचलेला आहे त्यामुळे रस्त्याचा निकृष्ठ दर्जा पावलोपावली दिसून येतो. नवीन रस्ता तयार करताना तो रस्ता पूर्णपणे उकरून काढून रस्त्याची लेवल करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता जुन्याच रस्त्यावर वाळू, खडी टाकून काँक्रीटीकरण केले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अवघ्या सहा महिन्यातच वरच्या रस्त्याच पापुद्रा निघून जुना रस्ता वर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिगळे लावलेली दिसून येत आहेत. रस्त्यावर समुद्रातील लाटांप्रमाणे चढउतार झाले आहेत.

शिवाजी हायस्कूल ते स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणचा रस्ता खचल्याने याठिकाणी अनेक वाहनधारक, पादचारी पडून जखमी होत आहेत. रस्त्यावर सर्वत्र खडी निघाल्याने वाहनधारक खडीवरून घसरत आहेत. गटारांची कामे करताना गटारांमध्ये साचलेले पाणी काढून त्यानंतर मुरूम टाकून क्राँक्रिटीकरण करणे गरजेचे असताना पाणी न काढताच त्यामध्ये दगड टाकून त्यावर सिमेंटचा थर दिल्याने आतील  लोखंडी सळ्या सिमेंटच्या बाहेर आल्या आहेत.त्यामुळे या‘आरसीसी’ गटारांची कामे किती दर्जेदार झाली आहेत हे दिसून येत आहे. त्यामुळे 11 कोटींचा हा रस्ता खड्ड्यात गेल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली जात आहे. 

रस्त्याच्या कामाबाबत आमरण उपोषणाचा इशारा

शहरातील मुख्य रस्त्यासाठी दिलेले काम मुदतीत झाले नाही तसेच या रस्त्यासाठी मिळालेल्या 11 कोटी रूपयांचा गैरवापर झाला असून  या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी विशेष समिती नेमावी व दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र अल्पसंख्यांक विभागाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे 9 मे 2017  रोजी केली होती. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने पठाण यांनी पुन्हा दि. 2 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून दि. 15 ऑगस्ट पर्यंत या कामाची चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.