Mon, Jul 06, 2020 03:34होमपेज › Satara › महिला दिन विशेष : शेतात तेवढेच कष्‍ट, मग मोबदला पुरूषांपेक्षा कमी का? video

महिला दिन विशेष : शेतात तेवढेच कष्‍ट, मग मोबदला पुरूषांपेक्षा कमी का? video

Published On: Mar 08 2019 1:01PM | Last Updated: Mar 08 2019 1:40PM
कुडाळ :  इम्तियाज मुजावर 

नोकरी आणि घर या जबाबदाऱ्या लीलया पेलत स्त्रीची संघर्षातून सुरु झालेली वाटचाल अलीकडच्या काळात सुकर झाली. मात्र शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांमध्ये जाणिवांचा जागर फारसा न झाल्याने विविध समस्यांना ग्रामीण भागातल्या महिलांना सामना करावा लागत आहे. 

वेगवेगळ्या आघाड्यांवर भरीव काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमीच आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान संस्‍कृतीमध्ये महिलांची भूमिका जास्‍त महत्‍वाची आहे. असे असताना महिला शेतकऱ्यांनी मात्र आज महिला दिनाच्या निमित्ताने विविध समस्यांचा टाहो फोडला आहे. 

पुरुषांना ज्याप्रमाणे समाजात व दैनंदिन जीवनात आदराचे स्थान दिले जाते, त्याप्रमाणे महिलांना आदराचे स्थान दिले जात नसल्याची खंत शेतकरी महिलांनी प्रत्यक्ष शेतात काम करत असतानाचं व्यक्‍त केली.

जगात एकीकडे आज महिला दिन मोठ्‍या उत्‍साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे विविध क्षेत्रातील महिला आजही आपला कष्‍टाचा गाडा नेमाने ओढत असल्‍याचे चित्र दिसत आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी महिला शेतामध्ये काम करत असताना दिसून आल्या. शेतकरी मजूर महिलांनी यावेळी आपल्‍या भावनांना मोकळी वाट करून दिली. आज महिलांना पुरूषांबरोबर समान हक्क दिला आहे असे बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात तो समान हक्क कुठेही दिसून येत नसल्याची खंत महिला दिनानिमित्त महिलांनी व्यक्त करून दाखवल्या. 

यावेळी सातार्‍याच्या जावळीतील कुडाळमध्ये शेतात काम करणार्‍या मजूर महिलांशी पुढारी ऑनलाईनने संवाद साधला. यामध्ये जागतिक महिला दिनात खरेचं महिला समाधानी आहेत का? त्‍यांना समानता जाणवते का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी महिलांनी आपल्‍या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

यावेळी शेतात नेहमीप्रमाणे काम करणार्‍या आणि कष्‍टालाचं देव माणणार्‍या महिलांनी बोलताना, पुरूष आणि स्‍त्रीयांमध्ये कष्‍टाच्या मोबदल्‍यातचं जर तफावत होत असेल, तर मग कसली स्‍त्री - पुरष समानता असा प्रश्न या महिलांनी यावेळी उपस्‍थित केला. 

शेतात स्‍त्री आणि पुरूष हे एकाच स्‍वरूपाचे काम करतात. दोघांनाही तीतकेच कष्‍ट घ्‍यावे लागते. कामही तितकेच करावे लागते. असे असताना शेतातील त्‍याच कामासाठी पुरुषांना पाचशे रुपये तर महिलांना तितकेच काम करूनही २०० रूपयांचा मोबदला दिला जातो. पुरूषाइतक्‍याच कामाचा मोबदला पुरूषांच्या मोबदल्‍यापेक्षा निम्म्‍याहून कमी पैशांच्या स्‍वरूपात का? असा प्रश्न महिलांना पडला आहे.

आज समाजात महिलांना ५० टक्‍के आरक्षण दिल्‍याचे जरी सांगितले जात असले, तरी प्रत्‍यक्षात तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्‍यामुळे आजही महिलांना दुय्‍यमच वागणूक मिळत असल्‍याचे वास्‍तव अधोरेखीत होत आहे. अशी खंत महिला मजूरांनी व्यक्‍त केली. 

आज महिला दिनानिमित्‍त पुढारी ऑनलाईनकडून शेतात मजूरी करणार्‍या महिलांशी बोलल्‍यानंतर हे दुजाभावाचे वास्‍तव समोर आले. हे समाजातले एक छोटेसे उदाहरण असले, तरी अनेक क्षेत्रात याशिवाय वेगळी परिस्‍थिती नाही. 

 पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले असल्याची खंतही ग्रामीण भागातल्या महिलांनी आज व्यक्त केल्या. अशा परिस्‍थितीत मग, महिलांना समान वेतन, समान दर्जा, समान वागणूक, समान शिक्षण, समान हक्‍क, समान स्‍वातंत्र, मिळणार का? असा प्रश्न आजच्या स्त्रियांयांसमोर आहे.